वारी

गाडीतून उतरून मी चालू लागलो... अज्ञाताच्या वाटेने, पण एका प्रबळ ओढीने. ही माणसं कुठे जातायत? का जातायत? कशासाठी ही ओढ? का एवढा अट्टाहास? काहीच समजत नसताना मी ही त्याच ओढीने आपोआप खेचला जाऊ लागलो होतो. आजूबाजूला कोण आहेत? काय चाललंय? कशासाठी चाललंय? काहीच आकलन होत नसताना मी फक्त ओढत चाललो होतो...

Story: विशेष कथा |
12 hours ago
वारी

काही दिवसांपूर्वी... ओपीडीतून निघालो असताना डॉ. रुक्मीचा फोन आला. डॉ. रुक्मी एक नावाजलेल्या पल्मोनोलॉजिस्ट. मुंबईतल्या एका गगनचुंबी इमारतीत स्वतःचा दवाखाना असलेल्या महाराष्ट्रातला नावाजलेल्या डॉक्टर. त्यांची अपॉइंटमेंट घ्यायची म्हणजे कितीतरी दिवस वाट पहावी लागायची. एका महत्त्वाच्या कॉन्फरन्समध्ये आमची ओळख झाली होती. त्यांनी सादर केलेल्या पेपरला तर सर्वांनी उभे राहून मानवंदना दिली होती. माझ्याही पेपरला उत्तम प्रतिसाद मिळाल्याने आमची ओळख झाली होती. कसे माहीत नाही, पण काही पेशंट्सविषयी बोलताना काही गाठी सुटत जाव्यात अशा चर्चेमुळे आम्ही एकत्र आलो होतो. माझ्यासाठी त्यांनी आठवड्यातून एक दिवस त्यांच्या क्लिनिकमध्ये पलीकडच्या केबिनमध्ये पेशंटसाठी राखून ठेवला होता. मला शक्य होईल तो दिवस मी ही तिकडे ठरवून जाऊ लागलो. अनुभव समृद्ध होताना अशी ओपीडी मिळणं म्हणजे अजून काय हवं?

त्या दिवशी तो पेशंट आला तोच... बारा-तेरा वर्षांचा एक मुलगा, पुंडलिक. त्याची आई, एका सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातील, त्याला घेऊन आली होती. पुंडलिकला श्वास घ्यायला खूप त्रास होत होता आणि सतत खोकला येत होता. डॉ. रुक्मींनी केस माझ्याकडे रेफर केली. मी पुंडलिकला तपासले. त्याची फुफ्फुसे खूपच कमजोर झाली होती आणि त्याला गंभीर न्यूमोनिया झाला होता. त्याचे एक्स-रे आणि स्कॅन रिपोर्ट पाहिले आणि मला धक्काच बसला. दोन्ही फुफ्फुसांमध्ये पाणी साचले होते आणि त्याची प्रकृती खूपच नाजूक होती. त्याची ऑक्सिजनची पातळी सतत खाली येत होती.

पुंडलिकाची आई माझ्यासमोर हात जोडून उभी होती. "डॉक्टर, काहीही करा, पण माझ्या मुलाला वाचवा. तोच माझा आधार आहे." मी तिला धीर दिला, पण माझ्या मनात शंकेची पाल चुकचुकली. मी नास्तिक होतो. विज्ञानावर माझा अढळ विश्वास होता. देवावर, चमत्कारांवर माझा कधीच विश्वास नव्हता. मला फक्त औषधे, उपचार आणि रुग्णाची प्रतिकारशक्ती एवढंच माहीत होतं.

पुंडलिकला लगेच आयसीयूमध्ये अॅडमिट करून उपचाराला सुरुवात केली. त्याला ऑक्सिजन लावला, तरी त्याची ऑक्सिजनची पातळी सुधारत नव्हती. आम्ही अँटिबायोटिक्स आणि इतर औषधे सुरू केली. दिवसातून अनेक वेळा मी त्याला तपासायचो. त्याची आई रात्रंदिवस त्याच्याजवळ बसून असायची, डोळ्यात पाणी आणून. अनेक औषधे, अनेक प्रयत्न, पण पुंडलिकाच्या तब्येतीत फारसा फरक पडत नव्हता. एक आठवडा उलटला, तरी त्याची प्रकृती चिंताजनकच होती. डॉ. रुक्मी माझ्या शेजारी उभ्या राहून मला धीर देत होत्या. त्या धार्मिक वृत्तीच्या होत्या, पण माझ्या नास्तिकतेला त्यांनी कधीही नावे ठेवली नाहीत. त्या फक्त म्हणायच्या, "आपण आपलं काम करत राहायचं, बाकी नियतीवर सोडून द्यायचं."

पण मी नियतीवर सोडणाऱ्यांपैकी नव्हतो. मी हार मानणारा नव्हतो. मी अनेक नवीन उपचार पद्धतींचा अभ्यास केला, जगभरातील डॉक्टरांशी संपर्क साधला. रात्रंदिवस मी फक्त पुंडलिकाचाच विचार करत होतो. माझ्यासाठी तो फक्त एक पेशंट नव्हता, तर माझ्या वैद्यकीय ज्ञानाची आणि अनुभवाची एक परीक्षा होती.

एक दिवस अचानक पुंडलिकाची तब्येत खूपच बिघडली. त्याला श्वास घेणे खूप कठीण झाले. त्याची आई रडून-रडून बेशुद्ध पडण्याच्या अवस्थेत होती. मी आणि डॉ. रुक्मीने शर्थीचे प्रयत्न केले. त्याला तातडीने व्हेंटिलेटरवर ठेवले. पण त्याचा प्रतिसाद मिळत नव्हता. मॉनिटरवरील रेषा खाली-वर होत होत्या आणि माझ्या हृदयाचे ठोके वाढत होते. मी पूर्णपणे हरलोय असेच सारखे वाटू लागले. मी रिपोर्ट्स पाहिले, आणि मला कळले की त्याच्यावर उपचारांचा परिणाम होत नाहीये.

त्या क्षणी, माझ्या मनात एक अनामिक विचार आला. मी आयुष्यात कधीही देवाचा धावा केला नव्हता, पण त्या क्षणी मी पुंडलिकाच्या आईकडे पाहिले. तिच्या डोळ्यांतील निराशेने मला आतून हलवून टाकले. मी तिच्याजवळ गेलो आणि तिच्या खांद्यावर हात ठेवून म्हणालो, "मी प्रयत्न करत आहे." पण माझ्या मनात एक विचार आला, कदाचित काहीतरी अलौकिक शक्तीची गरज आहे.

मी डोळे मिटले आणि मनातल्या मनात, अज्ञात शक्तीचा धावा केला, "या मुलाला वाचव!" माझ्यासाठी ही एक पूर्णपणे नवीन गोष्ट होती. काही क्षणांनी, जणू काहीतरी घडले. मॉनिटरवरील रेषांमध्ये थोडी सुधारणा दिसली. मी पुन्हा पुंडलिकला तपासले. काहीतरी बदलले होते. हळूहळू, अगदी हळूहळू, त्याच्या श्वासोच्छ्वासात सुधारणा दिसू लागली. ऑक्सिजनची गरज कमी झाली. दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत, पुंडलिक व्हेंटिलेटरवरून काढण्याइतका स्थिर झाला आणि धोक्याबाहेर होता.

मी त्याच्या आईला ही बातमी दिली तेव्हा तिच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहत होते. ती माझ्या पाया पडणार होती, पण मी तिला थांबवले. मला अजूनही विश्वास नव्हता की हे एखाद्या चमत्काराने झाले आहे. मी स्वतःला समजावले की कदाचित औषधांनी उशिरा काम केले असेल, किंवा त्याच्या प्रतिकारशक्तीने अखेर प्रतिसाद दिला असेल. पण कुठेतरी, माझ्या मनात एक लहानसा बदल झाला होता.

पुंडलिक पूर्णपणे बरा होऊन घरी गेला. त्याच्या आईने मला आणि डॉ. रुक्मीला भेटायला बोलावले. तिने कृतज्ञतेने सांगितले की तिने पुंडलिकसाठी पंढरपूरच्या विठ्ठलाला नवस केला होता. ती दरवर्षी वारीला जाते, पण यावेळी तिला जाता आले नव्हते. पुंडलिक बरा झाल्यावर ती नवस फेडण्यासाठी लगेच निघाली होती.

तिचे हे बोलणे ऐकून माझ्या मनात काहीतरी रुजले. मी नास्तिक असलो तरी, तिच्या डोळ्यातील श्रद्धेने मला विचार करायला भाग पाडले. वारी... पंढरपूर... विठ्ठल... माझ्या मनात हे शब्द घोळू लागले. त्या आईचा नवस आज मी पूर्ण करणार होतो.

आणि म्हणूनच आज... मी गाडीतून उतरून चालू लागलो होतो. अज्ञाताच्या वाटेने, पण एका प्रबळ ओढीने. ही माणसं कुठे जातायत? का जातायत? कशासाठी ही ओढ? का एवढा अट्टाहास? काहीच समजत नसताना मी ही त्याच ओढीने आपोआप खेचला जाऊ लागलो होतो. आजूबाजूला कोण आहेत? काय चाललंय? कशासाठी चाललंय? काहीच आकलन होत नसताना मी फक्त ओढत चाललो होतो... मी निघालो होतो याच्या पायांकडे. पंढरपूरच्या दिशेने, वारीत सामील होऊन.

माझ्या मनात विठ्ठल नव्हता, पण एक अनामिक शक्ती होती जिने मला या वाटेवर आणले होते. हजारो वारकऱ्यांच्या गर्दीत मी एकरूप झालो होतो. त्यांच्या जयघोषात, त्यांच्या भजनात, त्यांच्या उत्साहात मला एक वेगळीच ऊर्जा जाणवत होती. उन्हातान्हात पायी चालताना, पायांना फोड आले, पण मनात एक वेगळाच आनंद होता.

अखेर, तो दिवस आला. पंढरपूर... विठ्ठल मंदिराचे शिखर दिसले आणि माझे डोळे पाणावले. गर्दीतून वाट काढत मी मंदिरात प्रवेश केला. गाभाऱ्यात विठ्ठलाची मूर्ती पाहिली आणि माझे शरीर शहारले. मी कधीही नतमस्तक न होणारा माणूस, त्या विठ्ठलाच्या चरणी माथा टेकवून उभा होतो. माझ्या डोक्यातून सारे तर्क-वितर्क निघून गेले होते. तिथे फक्त एक शांतता होती, एक समाधान होते, आणि एक अनामिक श्रद्धा होती.

माझ्या डोळ्यासमोरून पुंडलिकाचा हसरा चेहरा सरकला, त्याच्या आईच्या डोळ्यातील कृतज्ञता दिसली. आयुष्यभर विज्ञानालाच सर्वस्व मानणाऱ्या मला, आज या अनपेक्षित प्रवासाने एका नव्या सत्याची ओळख करून दिली होती. ते सत्य शब्दातीत होते, तर्कातीत होते. ते फक्त अनुभवायचे होते. मी त्या अथांग विश्वासाच्या डोहात पूर्णपणे बुडून गेलो होतो. माझ्या डोळ्यातून नकळत अश्रू ओघळले. हे अश्रू आनंदाचे होते, समाधानाचे होते, आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, माझ्या आतील रिकाम्या जागेत भरून आलेल्या श्रद्धेचे होते.

मी त्या विठ्ठलाच्या पायावर डोके टेकवले. माझ्या डोक्याला शांत, थंड स्पर्श झाला. मला जाणवले, जणू काही अदृश्य हातांनी मला आधार दिला होता. माझ्या आयुष्यातील सर्व प्रश्न, सर्व चिंता, सर्व नास्तिक विचार त्या क्षणी विरघळून गेले. तिथे फक्त मी होतो आणि विठ्ठल होता. एका नास्तिकाचा आस्तिकतेकडे प्रवास त्या एका क्षणात पूर्ण झाला होता.


डॉ. अनिकेत मयेकर