ऐसे आर्त ज्याचे मनी । त्याची चक्रपाणी वाट पाहे ।।

ज्ञानदेव-नामदेवांच्या पूर्वकाळापासून एक विठ्ठलोपासक लोकसंप्रदाय म्हणून वारकऱ्यांचा इतिहास सांगता येतो. अगदी यादवकाळातील एक बहुजनमान्य लोकसंप्रदाय म्हणून या पंथाला आठ शतकापूर्वीच राजमान्यता मिळालेली होती. योगिराज ज्ञानदेव आणि भक्तराज नामदेव यांच्या योगभक्तीने भक्त-भागवतांची ही उपासना पुढच्या काळात अधिक बलवान बनली.

Story: विशेष |
10 hours ago
ऐसे आर्त ज्याचे मनी ।  त्याची चक्रपाणी वाट पाहे ।।

वारकरी संप्रदायाने श्री विठ्ठल हे आपले आराध्य दैवत आणि त्याची निष्काम भक्ती ही स्वतंत्र जीवननिष्ठा मानली, महाराष्ट्रधर्माचे जे प्रणेते संत सत्पुरुष मानले जातात, त्यापैकी श्रीसंत ज्ञानेश्वर- नामदेव- एकनाथ-तुकाराम हे प्रमुख वारकरी संतचतुष्टय. श्रीविठ्ठलोपासक वारकरी संतपुरुष आणि स्त्रियांनी रचलेले अभंगकाव्य हे या संप्रदायाला शेकडो वर्षांपासून प्रतिकुलतेत सतत उभारी देत राहिले. वर्षानुवर्षांच्या पंढरीच्या सामूहिक वारीची साधना त्यांची एक महाशक्ती ठरली. आजही लाखोंच्या संख्येने पांडुरंगाच्या भेटीसाठी निरपेक्ष यात्रा करणारा, काही सुनिश्चित सदाचार नियमितपणे करीत राहून अवघ्या विश्वाला एक आदर्श वस्तुपाठ देणारा, तळागाळापर्यंत पोहोचू शकलेला दुसरा संप्रदाय जगात दाखविता येणार नाही. एक वैशिष्टयपूर्ण आणि कदाचित सर्वाधिक लोकस्वीकृत असलेल्या या संप्रदायात त्याची निरंतरता आणि पुरातनता, संघटन आणि सुलभ आचारधर्म, काळावर मात करण्याची क्षमता लक्षणीय आहे.

पंढरपूरची वारी म्हणजे मराठी संस्कृतीचे एक विलोभनीय स्वरूप आहे. लोकमानसाचे आणि लोकप्रवाहाचे सांस्कृतिक मानस वारीतून दरवर्षी प्रकट होते. वारकऱ्यांचा हा देव 'लोकदेव'आहे. तो त्यांच्यातच राहतो, त्यांच्यासारखाच वावरतो. माळकरी त्याला उराउरी केव्हाही पूर्व अट वा पूर्व व्यवस्था न करता भेटू शकतो. सगळा वावर अगदी मनमोकळा. टाळ, मृदंग, चिपळयांच्या नादघोषातून उचंबळत्या, लक्ष लक्ष भक्तीभावपूर्ण हृदयातून 'अमृताहूनी गोड' विठ्ठल नामाचा गजर करीत महाराष्ट्रातूनच नव्हे तर जिथे जिथे मराठी माणूस आहे, त्या भारतवर्षाच्या सर्वदूर कानाकोपऱ्यातून सुशिक्षित-अशिक्षित, श्रीमंत-गरीब, स्त्री-शूद्रादी, आबाल-वृद्ध जीवीच्या आवडीने पायी अनवाणी "न लगे मुक्ती धन संपदा |संतसंग देई सदा||" या ओढीने आणि आवडीने पंढरीच्या वारीसाठी धावत जातात.

ज्ञानदेव-नामदेवांच्या पूर्वकाळापासून एक विठ्ठलोपासक लोकसंप्रदाय म्हणून वारकऱ्यांचा इतिहास सांगता येतो. अगदी यादवकाळातील एक बहुजनमान्य लोकसंप्रदाय म्हणून या पंथाला आठ शतकापूर्वीच राजमान्यता मिळालेली होती. योगिराज ज्ञानदेव आणि भक्तराज नामदेव यांच्या योगभक्तीने भक्त-भागवतांची ही उपासना पुढच्या काळात अधिक बलवान बनली. वारकरी पंथियांनी सातत्याने मायमराठीची सेवा केली. 'मराठीपण'टिकविले. पांडित्य प्रदर्शनाचे प्रस्थ वाढू दिले नाही. लोकभाषा, लोकछंद, लोकमाध्यमे आणि लोकसमाज यांची जवळीक सतत वाढती ठेवली. आज वारकरी हीच एक तळागाळापर्यंत पोहोचलेली इतिहासदत्त सामाजिक, सांस्कृतिक आचार-विचार धारा आहे. भक्ती ही जर समाजपरिवर्तनासाठी उपयोगी शक्ति ठरायची असेल तर वारकरी संप्रदायाकडे अपेक्षेने पाहिले जाते. आत्मज्ञानाबरोबर आत्मभान घडविणारा एक लोकमान्य संप्रदाय म्हणून आजच्या सैरभैर काळात त्याच्याकडून समंजसपणाची विशेष अपेक्षा करणे अनपेक्षित का ठरू नये.

पंढरपूरची वारी आषाढी आणि कार्तिकी एकादशी याच दिवशी होत असते. आणि चंद्रभागा नदीच्या तीरावर महाराष्ट्राचे जे लोकदैवत अठ्ठावीस युगे उभे आहे त्याच्याशी या वारीचा संबंध येतो. आणि त्याला उराउरी भेटण्यासाठी तहानभूक विसरून पायी चालत कष्टत लाखो लोकांचा महासागर पंढरपूर येथे एकत्र येत असतो. जनमानसात वारी म्हणजे 'पंढरीची वारी' असाच समज रूढ झालेला आहे. वारी आणि वारी करणारा वारकरी हा महाराष्ट्रीयच नव्हे, तर एकूणच भारतीय सांस्कृतिक परंपरेचा प्राणभूत घटक आहे. त्याचे ऊर्जाकेंद्र पंढरपूर आणि श्री विठ्ठल आहे. श्रीक्षेत्र पंढरपूर-श्री विठ्ठल आणि वारकरी यांचे घट्ट संजीवक नाते आहे. महाराष्ट्रातून व महाराष्ट्राबाहेर दहा ते बारा लाख वारकरी पायी वारी, दिंड्या घेऊन तीस-चाळीस दिवसांपासून पंढरपूरला येत असतात. यापूर्वी सर्वच प्रकारच्या महासत्ता आल्या गेल्या त्यांची जुलूम जबरदस्ती झाली, प्लेगच्या आजाराच्या साथीसह महामारी, नैसर्गिक संकटे आली गेली परंतु वारी 'अभंग' राहिली.

महाराष्ट्रातील मराठी संतांनी समाज प्रबोधनासाठी आणि भक्तिमार्गाच्या प्रचारासाठी पंढरीच्या वारीचा योग्य उपयोग करून घेऊन अंधश्रद्धा, कर्मकांड, व्रतवैकल्यांचा अतिरेक, जातीधर्मातील बेबनाव यांना पायबंद घालून एक विराट असे समूहमन तयार केले. त्यासाठी लोकपरंपरा, कीर्तन, प्रवचन, भजन यांचे सादरीकरणाचे माध्यम स्वीकारले. ओवी-अभंगांची रचना केली आणि वारीच्या प्रवासाला एक प्रयोजन मिळवून दिले. वारी करणे हा केवळ उपचार राहिला नाही तर, या दिंडी सोहळ्यात समूहमने तयार करून त्याच्यात एकच विचार, एकच आचार मिळवून दिला आणि तो सर्वसमावेशक आणि सर्वंकष असा ठरला. समूहाचे मानसशास्त्र ओळखून या संप्रदायातील लोकमान्य धुरीणांनी परंपरेला धक्का न लावता परिस्थितीनुसार भक्तीविचारांचे नियमन केले, संघटन केले असे म्हणता येईल.

संत ज्ञानेश्वरांपूर्वी वारीची प्रथा होती हे निश्चित. ज्ञानेश्वरांचे वडील विठ्ठलपंत हे आषाढी-कार्तिकी वारीस पंढरपूरला गेल्याचा उल्लेख संत नामदेव महाराजांनी केला आहे. वारीची प्रथा मुस्लिमपूर्व काळातही होती हे दाखवणारा शिलालेख धारवाड जवळच्या हेब्बळी गावात सापडला असून तो कन्नड भाषेत आहे. ताम्रपट व शिलालेख यांच्या आधारे पंढरपूर व तेथील विठ्ठल यांच्या इतिहासावर प्रकाश टाकण्याचे प्रयत्न इतिहास संशोधकांनी केलेले आहेत. डॉ भांडारकर, ग.ह.खरे, महाकवी दत्तोपंत बेंद्रे, डॉ दलरी, फरुकहार, स्टीव्हनसन, निकॉल मॅकनिकॉल, डॉ मिराशी, डॉ तुळपुळे वैगरे महाराष्ट्रीयन व पाश्चात्य संशोधकांनी पंढरपूरचा प्रामाणिक इतिहास शोधण्याचा प्रयत्न केला. तरीसुद्धा याच्या प्राचीन स्वरूपाविषयी व प्रारंभकालाविषयी सर्वमान्य असे विधान कोणीही करू शकलेले नाही.

ज्ञानेश्वरीत अनेक ठिकाणी वारी शब्द येतो. अनेक ठिकाणी रसभरीत भक्तिपूर्ण वर्णन आढळते,"आले आले हे हरीचे डिंगर | वीर वारीकर पंढरीचे ||"अशा शब्दात वारकऱ्यांचे सुंदर दर्शन घडवले आहे. वारीत भक्तिप्रधानता असते. देवाच्या दर्शनाबरोबरच संतदर्शनही महत्त्वाचे असते. म्हणून प्रत्येक शुद्ध एकादशीस देवाची तर वद्य एकादशीस संतांची वारी असते. पंढरी ही देवाची वारी, तर आळंदी ही संतांची वारी आहे. 'वारी' शब्दाचा अर्थ म्हणजे 'येरझार' पंढरपूरची वारी करावयाची म्हणजे आपल्या घरुन पायी चालत पांडुरंगाच्या भेटीला पंढरपुरला जायचे आणि भगवंताला भेटून परत घरी यायचे. 

महाराष्ट्राच्या अध्यात्मिक आणि सांस्कृतिक विचारप्रवाहाच्या निर्मितीमध्ये आणि रक्षणामध्ये वारकरी संप्रदायाचे योगदान अतुलनीय आहे. मानवी जीवनाच्या ऐहिक आणि पारलौकिक कल्याणाचा अत्यंत प्रशस्त असा राजमार्ग वारकरी संतांनी घालून दिला आहे. आत्मकल्याणाचे मार्ग विशिष्ट अधिकारसंपन्नतेच्या आग्रही अपेक्षांनी निश्चित झालेले असताना संतांनी सकल समाजासाठी आत्म आणि परकल्याणाचा मार्ग विस्तृत करून दिला, हे कार्य समाजपरिवर्तनाच्या दृष्टीने फार महत्त्वाचे ठरते.

समन्वयाकडे नेहमीच वारकरी संप्रदायाचा कल राहिला आहे. म्हणून इतकी वर्षे हा संप्रदाय टिकलाही आणि वृद्धिंगत होत आहे. नामासारखे सोपे साधन, रिकाम्या वेळेतील वारीची साधना, कीर्तनासारखे आत्मीय प्रबोधनाचे माध्यम गळ्यात तुळशीमाळ धारण करण्याने येणारे सहज वैराग्य, कपाळास गोपीचंदन आणि बुका या सहज क्रियेतून जीवनाचा सर्वांगीण उत्कर्ष वारकरी संप्रदाय साधून देतो, त्याचे सोपेपणा हेच त्याचे वेगळेपण आहे. महाराष्ट्रात अनेक पंथ-उपपंथ, संप्रदाय अनेक वर्षांपासून गुण्यागोविंदाने नांदले. 

वारकरी संप्रदायाने वैदिक आणि औपनिषादिक तत्वज्ञानाबरोबरच आजच्या दलित, ग्रामीण, स्त्रीवादी, जनवादी, कृषिनिष्ठ, पर्यावरणविषयक जाणिवा समृद्ध करणारे अशा विविध वाङ् मयीन संवेदनांचे बीजारोपणच केले नाही तर अध्यात्म दर्शनाबरोबरच या जाणिवांची पायाभरणी केली. त्यातूनच प्रेरणा घेऊन "इवलेसे रोप लावियले द्वारी |तयाचा वेलू गेला गगनावरी" असे त्याचे प्रत्यंतर आज येताना दिसते.

आषाढ महिन्यातील शुद्ध एकादशीस जी ही यात्रा भरते त्या एकादशीस देवशयनी एकादशी असेही म्हणतात. आषाढी यात्रा ही पंढरीतील महायात्रा म्हणून सुद्धा ओळखली जाते. भगवंत या एकादशीपासून शयन करतात. आषाढी एकादशीपासून चातुर्मास चालु होत. चातुर्मासात अधिकाधिक विठ्ठल गुणांचे, रुपाचे श्रवणकीर्तन करुन भक्त विठ्ठल प्राप्तीसाठी प्रयत्न करतात. 

शेकडो वर्षे झाली. काळ बदलला. यंत्रातंत्राचं आधुनिक युग आलं. पण आषाढी वारी सुरु आहे. एका पिढीची जागा दुसरी पिढी घेते. दर आषाढीला वारीची वाट संतप्रेमानं उचंबळून येते विठुनामाचा गजर टीपेला पोहोचतो... आषाढी आणि कार्तिकी या दोन्ही वाऱ्या संप्रदायाने प्रमाणभूत मानल्या असून वारी चुकू नये म्हणून प्रत्येक वारकरी त्या परमेश्वराला विनंती करीत म्हणत असतो,"हेचि व्हावी माझी आस |जन्मोजन्मी तुझा दास|पंढरीचा वारकरी वारी चुको न दे हरी||"श्रीविठ्ठल हा सुद्धा वारकरी लोकांचे उपास्यदैवत आणि सखा असल्याने "ऐसे आर्त ज्याचे मनी | त्याची चक्रपाणी वाट पाहे ||" या भावनेने भक्तांची वाट पाहात अठ्ठावीस युगे ज्या विटेवरी उभा आहे.


रवींद्र मालुसरे
मुंबई