आषाढी वारीतील विठ्ठल भेट

तेव्हा नकळतपणे रामाला साक्षात्कार झाला की, आपल्या मदतीला धावून आलेला इसम दुसरा-तिसरा कोणी नसून प्रत्यक्ष विठ्ठल होता. आपल्या अपार श्रद्धेमुळे त्याने आपली मदत करून आपल्याला पंढरपूर नगरीत आणले.

Story: कथा |
13 hours ago
आषाढी वारीतील विठ्ठल भेट

चंद्रपूर गावाच्या आवारात दररोज विठ्ठलभक्तीचा नाद ऐकू येत असे. या गावातील भक्तगणांमध्ये विठ्ठलभक्ती नांदत असे. त्याचप्रकारे गावात विठ्ठलभक्तीत रममाण झालेले राम व जनी नावाचे एक वृद्ध जोडपे राहत होते. हे जोडपे दरवर्षी आषाढी एकादशीला पायी वारी करून विठ्ठलाचे दर्शन घेत होते. मनात विठ्ठलाची श्रद्धा असल्यामुळे प्रत्येक वर्षी विठ्ठल-रक्माईच्या भेटीला जाणे ही त्यांची परंपरा बनली होती.

वारीचे दिवस जवळ आले होते पण वृद्धत्व आल्याने यावर्षी जनीला पायी वारी करणे जमणार नव्हते. म्हणून ती आपल्या पतीला म्हणाली, "अहो ऐका, मला यावर्षी वारीचा प्रवास जमणार नाही. मी इथूनच माझ्या विठ्ठलाचे दर्शन घेईन. तेव्हा तुम्ही वारीला जा." जनीचे हे शब्द ऐकून रामाला दुःख झाले. कारण दरवर्षी एकत्र आनंदात पायी वारी करणाऱ्या जनीशिवाय रामाची पंढरपूरची वारी अपूर्ण होती. त्यामुळे तो स्वस्थ बसला नाही, तर त्याने जनीला समजावले. पडत-पडत का असेना पण आपण दोघेही वारीला जाऊया असे सांगितल्यावर 'सावळ्या विठ्ठलाची छाया आपल्यामागे आहे' असे म्हणत जनी वारीला जायला तयार झाली.

दुसऱ्या दिवशी सकाळी सात वाजता जनी व राम गावातील वेतोबाच्या मंदिरात गेले. तिथे सर्व वारकरी जमलेले होते. तिथूनच सर्व वारकऱ्यांनी वारीला चालायला सुरुवात केली. पायी वारीत चालताना जनीचे पाय दुखत होते, तिला चालायला जमत नव्हते पण विठ्ठलाच्या स्मरणात व्यस्त असल्याने जनी आपल्या दुखण्याकडे दुर्लक्ष करत होती. तिचा पती राम मध्ये-मध्ये तिला चालायला मदत करत होता तर कधी जनीला प्यायला पाणी देत होता.

असेच सहा-सात दिवस निघून गेले आणि पायी चालणारी वारी पंढरपूरच्या जवळ पोहोचत आली. पंढरपूर वेशीच्या जवळ पोहचता पोहचता जनीला चालण्यास खूपच त्रास होऊ लागला. तिचे पाय खूपच दुखत होते. त्यावेळी रामाला देखील काहीच सुचत नव्हते. तो फक्त पांडुरंगाचे नाव मनात घेत होता. 

इतक्यात अचानक विठ्ठलभक्तीत रमलेल्या वारकऱ्यांच्या गर्दीतून एक अनोळखा इसम आला. तो वारकऱ्याच्या वेषात होता आणि दिंडी घालत-घालत, मुखातून विठ्ठल नामाचा जप करत तो जनी व रामाकडे पोहोचला. त्याने रामाला त्यांची अडचण विचारली व त्यावर तो म्हणाला, "तुम्ही चिंता करू नका, मी तुमच्यासोबत आहे," आणि जनी व राम यांनी पुन्हा वारीला चालायला सुरुवात केली. जेव्हा जनीला चालायला जमत नव्हते तेव्हा तो इसम तिला आईप्रमाणे उचलून घेत होता, कधी तिला प्यायला पाणी देत होता, तर मध्येच जनीच्या पायांना औषध लावीत होता.

अशाप्रकारे वेळ आणि दिवस निघून गेले. सगळे वारकरी पंढरपूरला पोहोचले. शेवटी, आषाढी एकादशीचा दिवस उजाडला. जनी व रामाला पंढरीच्या नगरीत पाऊल टाकून अखंड असा आनंद झाला. वृद्धपणात न होणारी पायी वारी करत जनी आपल्या पतीच्या व वाटेत भेटलेल्या त्या व्यक्तीच्या साहाय्याने व मदतीने पंढरपूरात पोहोचली. क्षणभर जनी व रामाने त्या व्यक्तीकडे समाधानाने पाहिले परंतु काही वेळाने तो अनोळखी व्यक्ती तिथून नाहीसा झाला. त्यावेळी जनी व राम त्या अनोळख्या इसमाला भर गर्दीमध्ये शोधत होते पण तो तिथे दिसेनासा झाला. जनी व रामाला तर त्या व्यक्तीचे नाव देखील माहीत नव्हते. सगळीकडे शोधाशोध केली पण तो कुठेच मिळाला नाही. त्यामुळे जनी व रामाला खूप दुःख झाले कारण त्यांना त्याचे आभार मानायचे होते. पण शेवटी ती व्यक्ती त्यांना भेटलीच नाही.

राम व जनी क्षणभर चक्रावले. त्या दोघांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तेव्हा नकळतपणे रामाला साक्षात्कार झाला की, आपल्या मदतीला धावून आलेला इसम दुसरा-तिसरा कोणी नसून प्रत्यक्ष विठ्ठल होता. आपल्या अपार श्रद्धेमुळे त्याने आपली मदत करून आपल्याला पंढरपूर नगरीत आणले. तेव्हा राम व जनीने विठोबाचे आभार मानले आणि ते दोघेही विठ्ठलभक्तीत तल्लीन होऊन गेले.

शेवटी, 'पांडुरंग दर्शनाची मज झाली पूर्ती' असे म्हणत राम व जनी हसतमुखाने व आनंदाने विठ्ठलाचे दर्शन घेण्यास निघाले.


पूजा भिवा परब 
पालये, पेडणे