घडवला भक्ती, कला आणि समाजप्रबोधन यांचा एकत्रित संगम
पेडणे : पेडणे तालुक्यातील मोरजी गावचे सुपुत्र अनिशकुमार पोके यांनी यंदाच्या आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूरच्या वारीत एक अनोखा आणि श्रध्देने भरलेला उपक्रम राबवून भक्तजनांचे आणि समाजाचे लक्ष वेधून घेतले आहे. गोवा ते पंढरपूर हा सुमारे ४५० किलोमीटरचा प्रवास पायी पूर्ण करत त्यांनी संत तुकाराम महाराजांचा जिवंत पुतळा साकारत भक्ती, कला आणि समाजप्रबोधन यांचा एकत्रित संगम घडवला.
अनिश पोके हे गेल्या काही वर्षांपासून विविध सामाजिक, सांस्कृतिक आणि अध्यात्मिक विषयांवर जिवंत पुतळ्यांच्या माध्यमातून जनजागृती करत आहेत. मात्र, यंदाचा त्यांचा उपक्रम विशेष ठरला. पंढरपूर वारी दरम्यान त्यांनी संत तुकाराम महाराजांचा पोशाख परिधान करून अनेक ठिकाणी थांबत अभंग गायन, संतांच्या शिकवणीवर आधारित संवाद व प्रदर्शन सादर करत वारकऱ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण केले.
त्यांनी साकारलेला संत तुकारामांचा जिवंत पुतळा पाहून वारकऱ्यांनी, आयोजकांनी आणि स्थानिक नागरिकांनी त्यांचे पुष्पहार घालून जाहीर स्वागत केले. भक्ती आणि परंपरेची ही सजीव अभिव्यक्ती पाहून अनेकांनी कौतुक व्यक्त केले. मुळगाव वारकरी संस्थेच्या पुढाकारातून झालेल्या या वारीत अनिशकुमार पोके यांचे योगदान केवळ कलाकार म्हणूनच नव्हे, तर एक प्रेरणा म्हणून गणले जात आहे.
आजच्या काळात पारंपरिक विचार आणि आधुनिक समाज यांच्यातील दरी रुंदावत असताना अशा उपक्रमांमधून परंपरेची सांगड नव्या पिढीला घालण्याचे अनिशकुमार पोके यांचे कार्य समाजासाठी प्रेरणादायी ठरत आहे.