जिल्हा पंचायत सदस्य एडविन कार्दोज यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

माणिकराव ठाकरेंची उप‌‌स्थिती : काँग्रेसला पुन्हा सत्तास्थानी आणण्याचे प्रदेशाध्यक्ष पाटकर यांचे आवाहन


12 hours ago
जिल्हा पंचायत सदस्य एडविन कार्दोज यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

काँग्रेसमध्ये दाखल झालेले एडविन कार्दोज आणि त्यांच्या समर्थकांसमवेत काँग्रेसचे नेते माणिकराव ठाकरे, खासदार विरियातो फर्नांडिस, विरोधी पक्ष नेते युरी आलेमाव, प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर व इतर.
....
प्रतिनिधी। गोवन वार्ता
मडगाव : नावेलीचे जिल्हा पंचायत सदस्य एडविन कार्दोज उर्फ सिप्रू यांनी शनिवारी एका कार्यक्रमात काँग्रेस पक्षात प्रवेश केला. नावेली मतदारसंघातील मतांच्या विभाजनामुळे भाजप जिंकला होता. आता आगामी निवडणुकांत पुन्हा काँग्रेसला सत्तास्थानी आणण्याचे आवाहन यावेळी मतदारांना करण्यात आले.
नावेलीतून तीनवेळा जिल्हा पंचायत सदस्यपदी निवडून आलेले एडविन कार्दोज यांचे काँग्रेस पक्षात प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी स्वागत केले. यावेळी काँग्रेसचे गोवा प्रभारी माणिकराव ठाकरे, डॉ. अंजली निंबाळकर, खासदार विरियातो फर्नांडिस, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, आमदार एल्टन डिकॉस्टा आदी उपस्थित होते. नावेलीत मतांचे विभाजन झाले आणि मागील विधानसभा निवडणुकीत ही जागा भाजपच्या ताब्यात गेली. आता लोकांना आपली चूक समजली असून पुढील निवडणुकीत पुन्हा काँग्रेसचा उमेदवार निवडून येण्यासाठी लोकांनी साथ द्यावी, असे जिल्हाध्यक्ष साविओ डिसिल्वा म्हणाले. वेळ्ळी मतदारसंघ जिंकण्यासाठीही एडविन यांची मदत मिळणार असल्याचे ते म्हणाले. आमदार एल्टन डिकॉस्टा यांनी सांगितले की, राज्यात प्रामुख्याने रस्ते, पाणी समस्या आहेत. पुन्हा एकदा काँग्रेस निवडून येण्याची गरज अाहे. विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी सांगितले की, नावेलीत आता काँग्रेसची पकड घट्ट झाली असून नावेलीसह दवर्ली जिल्हा पंचायत निवडणूकही काँग्रेसच जिंकेल.
‘संविधान बचाव’ आंदोलनाला चांगला प्रतिसाद : पाटकर
प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी सांगितले की, राज्यभरात ‘संविधान बचाव’ आंदोलनाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. काँग्रेसमधून गेलेल्यांचा उल्लेख कायम केला जातो; पण ज्या तिघांनी काँग्रेससोबत राहून विधानसभेत लोकांचे प्रश्न मांडले, त्यांचेही कौतुक होणे गरजेचे आहे. राज्यभरातील समस्या घेऊन काँग्रेस पुढे लढा देणार आहे. काहीजण स्वार्थासाठी पावसाळ्यातील बेडकासारखे बाहेर पडले असून त्यांच्यापासून दूर राहा.