गोव्यात आज मुसळधार पावसाचा इशारा

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
05th July, 01:27 pm
गोव्यात आज मुसळधार पावसाचा इशारा

पणजी : गोव्यात आज, ५ जुलै रोजी मुसळधार पावसाचा इशारा देत भारतीय हवामान विभागाने राज्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. समुद्रकिनाऱ्यावरील वाऱ्याचा जोर आणि सततच्या पावसाच्या पार्श्वभूमीवर सर्व जलक्रीडा आणि पर्यटन उपक्रम तात्पुरते बंद ठेवण्यात आले आहेत.

हवामान खात्याच्या अंदाजानुसार, ६ ते ११ जुलैदरम्यान यलो अलर्ट लागू राहणार असून, या कालावधीत राज्यात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. गोव्यात यंदा १ जून ते ५ जुलै या कालावधीत ४४.४७ इंच पावसाची नोंद झाली आहे. तर गेल्या २४ तासांत राज्यात १.६९ इंच पावसाची नोंद झाली. धारबांदोडात गेल्या २४ तासांत ३.६ इंच, फोंडात २.८७ इंच, साखळीत २.१४ इंच, केपेत २.१६ इंच आणि सांगेत २.१८ इंच पावसाची नोंद झाली आहे.   

प्रशासनाने नागरिकांना आणि पर्यटकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे. राज्य सरकारने पूरस्थिती, पाणी साचणे आणि इतर आपत्कालीन घटनांवर त्वरित प्रतिसाद देण्यासाठी यंत्रणा सतर्क ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. हवामान खात्याने नागरिकांना अनावश्यक प्रवास टाळण्याचे, हवामान इशाऱ्यांकडे लक्ष देण्याचे आणि स्थानिक प्रशासनाचे निर्देश पाळण्याचे आवाहन केले आहे.