युवकावर अॅसिड हल्ला, शस्त्र हल्ला आणि अफरातफर प्रकरणांनी गाजला आठवडा
पणजी : धारगळ येथे एका महाविद्यालयीन युवकावर अॅसिड हल्ला केल्याच्या प्रकाराने राज्यभर खळबळ माजली. संशयिताला काही तासांतच अटक करण्यात आली. पर्ये येथे युवकावर धारदार शस्त्राने गंभीर हल्ला, याशिवाय ‘सडा अर्बन’ अफरातफर, अष्टगंधा प्रकरणे चर्चेत राहिली असून या आठवड्यातील घडामोडींचा घेतलेला आढावा.
रविवार
तीन ज्येष्ठ नागरिकांना ३.२४ कोटींना गंडा
'डिजिटल अरेस्ट', क्रेडिट कार्ड आणि एटीएममध्ये मदतीच्या बहाण्याने कोट्यवधी रुपयांना गंडा घालण्यात आल्याच्या घटना समोर आल्या आहेत. यात आसगाव येथील एका ज्येष्ठ नागरिकाला २.१४ कोटी, दोनापावला येथील महिलेला ९७ लाख, तर जुने गोवा परिसरातील एका ज्येष्ठाला क्रेडिट कार्ड फसवणुकीत ३.१३ लाखांचा फटका बसला आहे.
लाईनमनचा शॉक लागून मृत्यू; चौकशी पूर्ण
होंडा-पोस्टवाडा येथे २० मे रोजी ट्रान्सफॉर्मरवर काम करत असताना शॉक लागून लाईनमन चंद्रू गावकर यांच्या झालेल्या मृत्यूच्या घटनेची अभियंत्यांनी केलेली चौकशी पूर्ण झाली आहे. याबाबतचा अहवाल लवकरच सरकारला सादर केला जाईल, अशी माहिती वीज खात्याच्या अभियंत्यांनी दिली. चुकीच्या पद्धतीने अर्थिंग रॉड बसवल्याने शॉकची तीव्रता वाढल्याचे या चौकशीतून समोर आले आहे.
नोकरीचे आमिष दाखवून वेरेतील युवकाला ९.५० लाखांचा गंडा
पार्टटाईम नोकरीची ऑफर देत गुगलवर प्रति रेटिंग ४० रुपयांचा परतावा देण्याचे आमिष दाखवून वेरे-बार्देश येथील एका युवकाची ९ लाख ५० हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी पर्वरी पोलिसांनी मुंबईतील २६ वर्षीय तरुणाला अटक केली आहे.
सोमवार
धारगळ येथे युवकावर अॅसिड हल्ला
धारगळ येथे एका महाविद्यालयीन युवकावर अॅसिड हल्ला केल्याच्या आरोपाखाली अवघ्या काही तासांतच पेडणे पोलिसांनी संशयिताला गजाआड केले. हल्ल्यानंतर करासवाडा-म्हापसा येथील औद्योगिक वसाहतीत संशयित लपून बसला होता. आपल्या मुलीच्या आत्महत्येला सदर युवकच कारणीभूत आहे. त्या रागातूनच आपण अॅसिड हल्ला केला, अशी कबुली संशयिताने पोलिसांसमोर दिली आहे.
डॉ. शिवानंद बांदेकर सोमवारी सेवानिवृत्त
वयाची ६५ वर्षे झाल्यानंतर गोवा मेडिकल कॉलेजच्या हॉस्पिटलचे वैद्यकीय अधिष्ठाता (डीन) डॉ. शिवानंद बांदेकर सोमवारी सेवानिवृत्त झाले. त्यांना सेवेत मुदतवाढ मिळाली नसल्याने ज्येष्ठतेप्रमाणे मुत्रपिंड (किडनी) आजाराचे तज्ज्ञ डॉ. जयप्रकाश तिवारी नवे डीन होण्याची शक्यता आहे.
मंगळवार
डॉ. जयप्रकाश तिवारी नवे डीन
राजकारणाचा फटका बसलेले आणि तीन वर्षांपूर्वी नियुक्ती होऊनही खुर्चीवर बसू न शकलेले डॉ. जयप्रकाश तिवारी यांची गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या नियमित डीनपदावर सरकारने नियुक्ती केली. २०२२ मध्ये काढलेला परंतु नंतर स्थगित ठेवलेला आदेश सरकारने आता मागे घेतला आहे.
नीलेश देसाई याला पोलीस कोठडी
धारगळ येथील एका कॉलेज विद्यार्थ्यांवर अॅसिड फेकल्याप्रकरणी संशयित नीलेश देसाई याला न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी ठोठावली.
घोगळ येथे फ्लॅटला आग
घोगळ येथील फेरेरा गार्डन फेज या इमारतीतील एका फ्लॅटमध्ये गिझरला आग लागल्याने दहा हजारांचे नुकसान झाले. मडगाव अग्निशामक दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवले.
घरावर झाड पडून भाऊ- बहीण जखमी
पोडवाळ- खोर्जुवे येथील विनायक नागडे यांच्या घरावर माड कोसळल्याने झालेल्या दुर्घटनेत भाऊ- बहीण जखमी झाले. विकी नागडे (३२) व वैद्यही नागडे (२८) अशी जखमींची नावे असून त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले.
बुधवार
पंचवाडी, तिलारी ‘ओव्हरफ्लो’
गेले काही दिवस राज्यात संततधार पावसाची नोंद झाली होती. बुधवारी राज्याला पावसाने झोडपून काढले. अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची नोंद झाली. यामुळे झाडे पडून नुकसानीच्या घटनांची नोंद झाली. पंचवाडी, तिलारी धरण ‘ओव्हरफ्लो’ झाले आहे.
केरी अबकारी तपासणी नाक्यावर १२ लाखांचा अवैध दारूसाठा जप्त
गोव्यातून बेळगावच्या दिशेने चोर्लामार्गे जाणाऱ्या टेम्पोवर केरी येथे कारवाई करून सत्तरी अबकारी खात्याच्या कर्मचाऱ्यांनी १२ लाखांचा बेकायदेशीर दारूसाठा जप्त केला आहे. यासाठी वापरण्यात आलेली पिकअप ताब्यात घेण्यात आली आहे. एकूण ३२ लाखांची मालमत्ता अबकारी खात्याच्या कर्मचाऱ्यांनी जप्त केली आहे.
कोलवाळ कारागृहात तंबाखूची तस्करी
कोलवाळ कारागृहात प्रतिबंधित नशेच्या पदार्थांची तस्करी करताना सुरक्षा यंत्रणेने एका अप्रेंटिस कर्मचाऱ्याला रंगेहात पकडले. याप्रकरणी कारागृह प्रशासनाने बुधवारी सायंकाळी कोलवाळ पोलिसांत तक्रार दिली आहे.
गुरुवार
कुशावती नदीला पूर, राज्यभरात पडझड
गुरुवारी दिवसभर राज्याला पावसाने अक्षरशः झोडपून काढले. पावसामुळे पडझड होऊन नुकसानीच्या घटनांची नोंद झाली. पारोडा येथे कुशावती नदीला पूर आल्याने केपे- मडगाव मार्ग पाण्याखाली गेला. पावसामुळे चिंबल येथील एका घराची भिंत कोसळून पडली. पावसाने तिसवाडी, बार्देश, पेडणे, डिचोली, सत्तरी, सांगे सासष्टी, फोंडा, धारबांदोडा येथे पडझडीच्या घटना घडल्या.
मंत्री मोन्सेरातच्या ‘युगोपा’सह ४ पक्षांची नोंदणी धोक्यात
महसूल मंत्री बाबूश मोन्सेरात यांनी २०१७ च्या गोवा विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी स्थापन केलेल्या युनायटेड गोवन्स पार्टीची (युगोपा) नोंदणी आता रद्द होण्याच्या मार्गावर आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार गोव्याचे मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी या पक्षाला कारणे दाखवा नोटीस जारी केली आहे.
चार शाळकरी मुलांना मारहाण, शिक्षिकेविरुद्ध गुन्हा
सांत इस्तेव, तिसवाडी येथील एका विद्यालयातील चार विद्यार्थ्यांना मारहाण केल्याप्रकरणी संशयित आरोपी शिक्षिकेविरुद्ध जुने गावे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मारहाणीत सापडलेले विद्यार्थी हे १३ व १४ वयोगटांतील आहेत. याप्रकरणी जुने गोवे पोलिसांत माशेल-फोंडा येथील पीडित मुलाच्या आईने इतर पालकांच्यावतीने तक्रार दिली आहे.
माशेल, व्हिजनरी, अष्टगंधामध्ये ७५ कोटींचा घोटाळा
आर्थिक गैरव्यवहारांमुळे संकटात सापडलेल्या माशेल महिला, व्हिजनरी आणि अष्टगंधा क्रेडिट सोसायट्यांमध्ये एकूण १०,५८७ ठेवीदारांचे सुमारे ७५ कोटी रुपये अडकले आहेत. या क्रेडिट सोसायट्या बंद पडण्याच्या मार्गावर असल्याने ठेवीदारांचे भवितव्य अंधारात आहे.
शुक्रवार
‘उटा’च्या सभा, आर्थिक व्यवहारांवर तात्पुरते निर्बंध
‘उटा’ या अनुसूचित जमाती (एसटी) संघटनेची सार्वत्रिक निवडणूक सप्टेंबर २०२५ मध्ये होणार आहे. तोपर्यंत सध्याच्या विद्यमान कार्यकारिणीने कोणतीही सभा घेऊ नये, आर्थिक व्यवहार करू नयेत, असा आदेश दक्षिण गोवा जिल्हा निबंधक सूरज वेर्णेकर यांनी दिला आहे.
‘सडा अर्बन’ अफरातफर प्रकरणी १.०५ कोटींच्या स्थावर मालमत्ता जप्त
सडा अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसायटी लिमिटेडच्या झुआरीनगर येथील शाखेत तत्कालीन कर्मचाऱ्याने अफरातफर, फसवणूक केल्याप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) पणजी विभागाने वास्को येथील एकूण १.०५ कोटी रुपयांच्या दोन स्थावर मालमत्ता तात्पुरत्या जप्त केल्या आहेत. ही कारवाई मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंधक कायदा २००२ अंतर्गत करण्यात आली आहे.
विद्यार्थ्यांला मारहाण करणाऱ्या शिक्षिकेला अटक
सांत इस्तेव येथील सेंट तेरेझा हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना केलेल्या मारहाण प्रकरणी क्लॅन्सी डिसिल्वा (बिठ्ठोण - पर्वरी) या शिक्षिकेला जुने गोवे पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेऊन अटक केली. नंतर तिची जामिनावर सुटका करण्यात आली. दरम्यान, शिक्षण संचालकांनी मारहाणप्रकरणी सेंट तेरेझा हायस्कूलच्या व्यवस्थापनाकडे अहवाल मागितला आहे.
शनिवार
दोन अल्पवयीन मुलींचे अपहरण
कुंकळ्ळी परिसरात राहणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींचे अपहरण करण्यात आले. याप्रकरणी कुंकळ्ळी पोलिसांनी अज्ञातांविरोधात गुन्हा नोंद केला असून तपास सुरू केला आहे.
लक्षवेधी
सार्वजनिक खात्यात (पीडब्ल्यूडी) १५.१४ लाखांची अफरातफर केल्याप्रकरणी एसीबीने अव्वल कारकून रायू हळदणकर याच्याविरोधात मेरशी येथील उत्तर गोवा जिल्हा व सत्र न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. १०० पानी आरोपपत्रात ३० साक्षीदारांच्या साक्षी नोंद केल्या आहेत.
दयानंद सामाजिक व गृह आधार मिळून विधवा भगिनींना आता महिन्याला ४ हजार रुपयांची पेन्शन मिळणार आहे. यासाठी विधवा भगिनीच्या मुलाचे वय २१ वर्षांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ही घोषणा केली.
पर्ये-सत्तरी येथील ग्रीन व्हॅली रेस्टॉरंटजवळ एका २७ वर्षीय युवकावर धारदार शस्त्राने गंभीर हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात सदर युवकाच्या डोक्याला गंभीर इजा झाली आहे. युवक अनिकेत सिंगबाळ (२७, रा. हाऊसिंग बोर्ड, साखळी) याला तत्काळ साखळी प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी हलवण्यात आले.
पर्ये-सत्तरी येथील ग्रीन व्हॅली रेस्टॉरंटजवळ एका २७ वर्षीय युवकावर धारदार शस्त्राने गंभीर हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात सदर युवकाच्या डोक्याला गंभीर इजा झाली आहे. युवक अनिकेत सिंगबाळ (२७, रा. हाऊसिंग बोर्ड, साखळी) याला तत्काळ साखळी प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी हलवण्यात आले.