साखळी : वाहन पार्किंगवरून युवकावर धारधार शस्त्राने हल्ला

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
05th July, 02:05 pm
साखळी : वाहन पार्किंगवरून युवकावर धारधार शस्त्राने हल्ला

पणजी : पर्ये-सत्तरी  येथील ग्रीन व्हॅली रेस्टॉरंटजवळ, शनिवार ५ जुलैच्या उत्तररात्री  २.२० वाजता एका २७ वर्षीय युवकावर धारदार शस्त्राने गंभीर हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात सदर युवकाच्या डोक्याला गंभीर इजा झाली आहे. पीडित युवक अनिकेत सिंगबाळ (२७, रा. हाऊसिंग बोर्ड, साखळी) याच्यावर तात्काळ साखळी प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी हलवण्यात आले.

या घटनेची माहिती मिळताच साखळी परिसरात रात्री गस्तीवर असलेल्या डिचोली पोलीस स्थानकाचे तसेच वाळपई पोलीस स्थानकाचे निरीक्षक विजय राणे यांनी पोलीस हवालदार नीलेश फोगेरी, कॉन्स्टेबल दयेश खांडेपारकर व शैलेश धवणे यांच्यासह घटनास्थळी धाव घेतली. केवळ ३० मिनिटांत पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले. आरोपीचे नाव योगेश सुभाष राणे (२७, रा. देऊळवाडा, विठ्ठलापूर, कारापूर, डिचोली) असे असून त्याला अटक करण्यात आली आहे.

वाहन रस्त्यावर पार्क केल्याच्या कारणावरून दोघांमध्ये शाब्दिक वाद झाला. याचे पर्यवसान झटापटीत झाले आणि नंतर हा हल्ला घडल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे. या प्रकरणी 

वाळपई पोलीस स्थानकात भारतीय न्यायसंहिता २०२३ अंतर्गत कलम ११८(२), ३५१(२), ३५२, १०९ अन्वये खूनाचा प्रयत्न व धमकी देणे या आरोपाखाली गुन्हा नोंदविण्यात आला आहे. ही संपूर्ण कारवाई उत्तर गोवा पोलीस अधीक्षक राहुल गुप्ता व डिचोलीचे पोलीस उपअधीक्षक विल्सन डिसोझा यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पोलीस निरीक्षक विजय राणे यांच्या नेतृत्त्वाखाली पार पडली. पोलीस उपनिरीक्षक प्रथमेश गावस पुढील तपास करत आहेत.