‘उटा’ शक्तिप्रदर्शनाचे व्यासपीठ होऊ नये !

गोविंद शिरोडकर : प्रकाश वेळीप यांच्यावर हुकूमशाहीचा आरोप


05th July, 11:43 pm
‘उटा’ शक्तिप्रदर्शनाचे व्यासपीठ होऊ नये !

पत्रकारांशी संवाद साधताना गाकुवेधचे गोविंद शिरोडकर. सोबत पदाधिकारी.
प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : ‘उटा’ संघटनेच्या आगामी निवडणुकीत प्रत्येक संघटनेला प्रतिनिधित्व दिले जाईल. या संघटनेचे कार्य समाजाभिमुख होण्यासाठी राज्यभरात बैठका घेतल्या जातील. ‘उटा’चे व्यासपीठ मंत्र्यांना शक्तिप्रदर्शनासाठी वापरू दिले जाणार नाही, असे ‘उटा’चे संस्थापक सदस्य तथा गाकुवेधचे अध्यक्ष गोविंद शिरोडकर यांनी सांगितले.
‘उटा’ची कार्यकारिणी बेकायदेशीर आहे, अशी तक्रार एसटी समाजाच्या सहा संघटनांनी दक्षिण गोवा जिल्हा निबंधकाकडे केली होती. सुनावणीवेळी जिल्हा निबंधकानी ही समिती बरखास्त करून त्या जागी प्रशासकाची नियुक्ती करण्याचा आदेश दिला. पुढील आदेशापर्यंत विद्यमान कार्यकारी समितीने सभा घेऊ नये, आर्थिक व्यवहार करू नयेत, असे तात्पुरते निर्बंध घातले आहेत. या विषयी पणजीतील आझाद मैदान येथे शुक्रवारी पत्रकार परिषदेत गोविंद शिरोडकर बोलत होते. शिरोडकर यांनी ‘उटा’चे अध्यक्ष प्रकाश वेळीप यांच्यावर टीका केली. ते म्हणाले, प्रकाश वेळीप यांनी ‘उटा’च्या आठपैकी सहा संघटनांना विश्वासात न घेता हुकूमशाही पद्धतीने कारभार चालवला आहे.
‘उटा’च्या अध्यक्षपदी एका व्यक्तीला दोन कार्यकाळ म्हणजे सहा वर्षांहून अधिक दिवस राहता येत नाही. प्रकाश वेळीप २००४ मध्ये निवडून आले होते. तेव्हापासून ते अध्यक्ष आहेत. २०२२ मध्ये निवडणूक न घेताच समिती घोषित करण्यात आली. या निर्णयाविरोधात आम्ही दक्षिण गोवा निंबधकांकडे तक्रार केली. आम्ही ही समिती बेकायदेशीर असल्याचे म्हटले आहे, असे शिरोडकर यांनी सांगितले.
सप्टेंबर २०२५ मध्ये ‘उटा’ची निवडणूक घेण्यासाठी आम्ही राज्यभर फिरून जागृती करणार आहोत. ‘उटा’त सहभागी सर्व संघटनांना आम्ही प्रतिनिधित्व देऊ. ‘उटा’चा वापर राजकारणासाठी, मंत्र्याची खुर्ची वाचवण्यासाठी, शक्तिप्रदर्शन करण्यासाठी होणार नाही, याची आम्ही काळजी घेऊ, असेही शिरोडकर यांनी सांगितले.


सोमवारी भूमिका मांडणार : प्रकाश वेळीप
दक्षिण गोवा जिल्हा निबंधकांनी दिलेल्या आदेशावर सोमवारी पत्रकार परिषद घेऊन स्पष्टीकरण देऊ, असे ‘उटा’चे अध्यक्ष प्रकाश वेळीप यांनी सांगितले. सत्य आणि तथ्य काय आहे, हे सोमवारी आम्ही स्पष्ट करू. आमच्यावर आरोप करणाऱ्या संघटनांना आम्ही सोमवारीच उत्तर देऊ, असेही प्रकाश वेळीप यांनी सांगितले.

हेही वाचा