पक्षाच्या कार्यालयाचे आमदार व्हेंझी व्हिएगस यांच्या हस्ते उद्घाटन
म्हापसा येथे ‘आप’च्या कार्यालयाचे उद्घाटन करताना आमदार व्हेंझी व्हिएगस. बाजूस इतर.
प्रतिनिधी । गोवन वार्ता
म्हापसा : येथील नगरपालिकेची आगामी निवडणूक आम आदमी पक्ष (आप) लढवणार आहे, अशी घोषणा पक्षाचे बाणावलीचे आमदार व्हेंझी व्हिएगस यांनी केली. शनिवारी म्हापसा येथील पक्ष कार्यालयाचे उद्घाटन आमदार व्हेंझी यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर ते बोलत होते. यावेळी पक्षाचे नेते वाल्मिकी नाईक, सिद्धेश भगत, सलमान खान, जर्सन गोम्स व इतर उपस्थित होते.
आमदार व्हेंझी व्हिएगस पुढे म्हणाले की, आम आदमी पक्ष हा म्हापसा पालिकेतील सर्व २० प्रभागांत उमेदवार उतरवणार आहे. सध्या भाजप सरकारला जनतेचे काहीच देणे-घेणे राहिलेले नाही. महागाईने सर्व विक्रम मोडले आहेत. लोकांना मूलभूत सुविधा देण्यातही सरकार अपयशी ठरले आहे. जनतेला बदल हवा आहे. त्यामुळे त्यांनी आम आदमी पाक्षाला साथ द्यावी. हातात झाडू घेऊन भाजप सरकारला सत्तेतून दूर करावे. भाजपला सत्तेतून बाहेर काढण्याची सुरुवात म्हापसा नगरपालिकेतून करावी, असे आवाहन व्हेंझी व्हिएगस यांनी म्हापसावासीयांना केले.