म्हापसा फूल मार्केटचा वीजपुरवठा कापला

बील थकित ठेवल्यामुळे वीज खात्याची कारवाई


05th July, 11:45 pm
म्हापसा फूल मार्केटचा वीजपुरवठा कापला

म्हापसा फुलाच्या मार्केटमधील वीज पुरवठा कापल्यामुळे विक्रेत्यांनी शनिवारी लवकर व्यवसाय बंद केला.
प्रतिनिधी । गोवन वार्ता
म्हापसा : येथील बाजारपेठेतील फुलाच्या मार्केटमधील दोन महिन्यांचे वीज बील थकले आहे. परिणामी वीज खात्याने मार्केटचा वीजपुरवठा कापला आहे. वेळेत बील न भरल्यामुळे पालिकेवर वीज कापणीच्या कारवाईला सामोरे जाण्याची नामुष्की ओढवली आहे.
प्राप्त माहितीनुसार, शुक्रवारी म्हापसा वीज कार्यालयातर्फे फुलाच्या बाजारातील वीजपुरवठा कापण्यात आला. या मार्केटमधील मे व जून या दोन महिन्यांचे सुमारे ३० हजार रुपयांचे वीज बील थकले आहे. बिलाचा भरणा न केल्यामुळे वीज खात्याकडून शुक्रवारी मार्केटचा वीजपुरवठा कापला गेला. वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे बाजारात अंधार पसरला. गेले दोन दिवस विक्रेत्यांना उकाड्यात व्यवसाय करावा लागला. रविवार सुट्टीचा दिवस असल्याने वीज बिलाचा भरणा होणार नाही. सोमवारी पालिकेकडून बिलाचा भरणा होण्याची शक्यता आहे. तोपर्यंत विक्रेत्यांना खंडित वीज पुरवठ्याचा सामना करावा लागणार आहे.
फूल बाजारात सुमारे ३० व्यावसायिक
फुलाच्या बाजारात फूल विक्रेत्यांसह मासळी, माडाचे गूळ, शिंपी, असे जवळपास ३० च्या आसपास विक्रेते व्यवसाय करतात. त्यांनी स्वतःसाठी पंखा व वीज दिव्यांची व्यवस्था केली आहे. ही वीज उपकरणे दिवसभर सुरू असतात. रात्रीच्या वेळी दिवे चालू ठेवले जातात. त्यामुळे वीज बील जास्त येते. बील भरणा करण्यासाठी नंतर पालिका अधिकारी वेळकाढूपणा करतात. हल्ली वीज खात्याकडून एक महिन्याचेच वीज बील थकित ठेवले जाते. नंतर बील थकित ठेवल्यास पूर्वसूचना न देता वीजपुरवठा कापण्याची कारवाई केली जाते. वर्षोनुवर्षे बील थकित ठेवण्याची मानसिकता बळावल्यामुळे खात्याने हा निर्णय घेतला आहे.