गंभीर गुन्ह्यांचा तपास शंभर टक्के पूर्णः पोलीस अधीक्षक
मडगाव : दक्षिण गोव्यात गेल्या सहा महिन्यांच्या कालावधीत खुनाची ११ प्रकरणे नोंद असून तपास करुन सर्व संशयितांना गजाआड करण्यात आले. याशिवाय लैंगिक अत्याचारांच्या २० पेक्षा जास्त प्रकरणांतही संशयितांवर अटकेची कारवाई करण्यात आली आहे. दक्षिण गोव्यातील खून, खुनाचा प्रयत्न, लैंगिक अत्याचारांसारख्या गंभीर गुन्ह्यांचा शंभर टक्के तपास पूर्ण झाला असल्याची माहिती पोलीस अधीक्षक टिकमसिंग वर्मा यांनी सांगितले.
सायबर गुन्हे रोखण्यासाठी जनजागृतीवर भर देण्यात आला आहे. याशिवाय प्रत्येक पोलीस ठाण्यात सायबर क्राईम रिस्पॉन्स सेलची स्थापना केली आहे. इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजीचा वापर इतरही गुन्ह्यात होत असतो. दक्षिण गोव्यातील प्रत्येक पोलीस स्थानकात सायबर गुन्ह्यांच्या तपासासाठी एक पोलीस उपनिरीक्षक व त्यासोबत आणखी दोन कर्मचार्यांनी नियुक्ती करण्यात आली आहे. प्रत्येक ठिकाणी तक्रार आल्यानंतर गुन्हा नोंद करत तपास केला जात आहे, अशी माहिती दक्षिण गोवा पोलीस अधीक्षक टिकमसिंग वर्मा यांनी दिली. हाउझीला कायदेशीर परवानगी नसल्याने दक्षिण गोव्यात ज्याठिकाणी हाउझी सुरु असतील त्याठिकाणी कारवाई करण्याच्या सूचना पोलिसांना दिलेल्या आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली.
एकूण ४३२ पैकी ३७३ प्रकरणांचा तपास पूर्ण
दक्षिण गोव्यात जानेवारी ते जून या सहा महिन्यांच्या कालावधीत भारतीय न्यायसंहितेच्या कलमांतर्गत सुमारे ४३२ प्रकरणे नोंद आहेत. त्यातील ३७३ प्रकरणांचा तपास पूर्ण करण्यात आला आहे. या गुन्ह्यांत फसवणूक व चोरींच्या प्रकरणांची संख्या जास्त आहे. गंभीर गुन्ह्यांचा तपास १०० टक्के पूर्ण असून इतर प्रकरणांचा विचार करता ८६ टक्के प्रकरणांत तपास पूर्ण करत संशयितांवर कारवाई करण्यात दक्षिण गोवा जिल्हा पोलिसांना यश आले आहे, अशी माहिती दक्षिण गोवा जिल्हा पोलीस अधीक्षक टिकमसिंग वर्मा यांनी दिली.