सुकूर जमीन हडप प्रकरणी 'ईडी'चे छापे : आर्थिक व्यवहारांचा घेणार शोध
पणजी : सुकूर येथील सर्व्हे क्रमांक २१०/५ मधील जमीन हडप केल्याच्या प्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) संदीप वझरकर, जॉन पॉल वालीस, संदीप मांजरेकर आणि अविनाश नाईक यांच्या घरातून अनेक इलेक्ट्रॉनिक उपकरणे आणि मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी कागदपत्रे जप्त केली आहेत. यात स्थावर मालमत्तेशी संबंधित आणि रोख नोंदींच्या माहिती असलेल्या डायरी, विविध विक्री करार, पॉवर ऑफ अॅटर्नी आणि अनेक इन्व्हेंटरी कार्यवाहीशी संबंधित कागदपत्रांचा समावेश आहे. जप्त केलेल्या वस्तूंची छाननी करून या गुन्ह्यातील आर्थिक व्यवहारांचा ईडी शोध घेणार आहे.
ईडीने शुक्रवारी (दि. ४) सुकूरचे माजी सरपंच संदीप अर्जुन वझरकर यांच्या पर्वरी येथील घरासह त्यांच्या साथीदारांच्या गोवा आणि पुण्यातील एकूण आठ ठिकाणी छापे टाकले. शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत ही कारवाई सुरू होती.
२०२२ मध्ये सुकूर येथील जेरॉमिनो ओलिवेरीओ डिसोझा यांनी पर्वरी पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली होती. डिसोझा यांच्या आई-वडिलांच्या नावे सुकूरमध्ये ५ हजार चौ.मी. जमीन होती. संशयित सँड्रा डिसा आणि मौरीन साल्ढाणा यांच्या आई-वडिलांच्या नावात साम्य होते. याचा गैरफायदा घेऊन, संशयितांनी जॉन आणि वझरकर यांना हाताशी धरून बनावट दस्तऐवज तयार केले आणि जमीन आपल्या नावावर केली. त्यानंतर या जमिनीचे भूखंड करून ते विकण्यात आले. या तक्रारीच्या आधारे पर्वरी पोलिसांनी संशयितांविरोधात भा.दं.सं.च्या कलम ४६५, ४६८, ४७१, ४१९, ४२० व ३४ अंतर्गत गुन्हा नोंद केला होता.
ईडीच्या चौकशीत वझरकरची कबुली
या गुन्ह्याची दखल घेऊन ईडीने संदीप वझरकरची चौकशी केली होती. या चौकशीत वझरकर याने वरील जमीन प्रकरणी १० लाख रुपये दलाली घेतल्याची कबुली दिली. वझरकरच्या बँक खात्यांची चौकशी केली असता, त्याच्या खासगी आणि व्यावसायिक बँक खात्यांमध्ये मोठ्या प्रमाणात रोख रक्कम जमा झाल्याचे समोर आले. या माहितीच्या आधारे ईडीने ४ जुलै रोजी पहाटे ६ वाजल्यापासून गोवा आणि पुण्यातील आठ ठिकाणी छापा सत्र सुरू केले. ईडी या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे.