पावसाचा जोर कमी, हवामान खात्याचा ‘यलो अलर्ट’ जारी
पणजी : राज्यात मागील काही दिवसात झालेल्या मुसळधार पावसामुळे अंजुणे धरणातील पाणी साठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. बुधवारी अंजुणे धरणातील पाणीसाठा ३४ टक्के होता. शनिवारी त्यात तब्बल १३ टक्क्यांनी वाढ होऊन तो ४७ टक्के झाला. ५ जुलै अखेरीस साळवली ११४ टक्के, चापोलीत ८४ टक्के, पंचवाडीत १०१ टक्के, गवाणेमध्ये १०० टक्के, तर आमठाणे धरणात ७ टक्के पाणीसाठा शिल्लक होता.
राज्यात शनिवारी पावसाचा जोर कमी होता. बहुतेक ठिकाणी ऊन-पावसाचा खेळ सुरूच होता. हवामान खात्याने राज्यात ६ ते ११ जुलै दरम्यान मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. यानुसार या सहा दिवसांसाठी पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. राज्यात चोवीस तासांत सरासरी १.६९ इंच पावसाची नोंद झाली. यादरम्यान धारबांदोडामध्ये ३.६३ इंच, फोंडामध्ये २.८७ इंच, सांगेत २.१८ इंच, केपेत २.१६ इंच पावसाची नोंद झाली.
राज्यात १ जून ते ५ जुलै दरम्यान सरासरी ४४.४७ इंच पावसाची नोंद झाली आहे. यंदा पावसाचे प्रमाण २.९ टक्क्यांनी अधिक आहे. शनिवारी पणजीमध्ये कमाल ३०.८ अंश सेल्सिअस तर किमान तापमान २४.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. मुरगाव मधील कमाल तापमान ३० अंश तर किमान तापमान २५.४ अंश सेल्सिअस राहीले. पुढील सहा दिवस राज्यातील कमाल तापमान ३१ अंश तर किमान तापमान २५ अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता खात्याने व्यक्त केली आहे.
४ केंद्रात पाऊस ५० इंच पार
राज्यात १ जून ते ५ जुलै दरम्यान १४ पैकी ४ केंद्रात पावसाचे ५० इंचाची सरासरी पूर्ण केली होती. यादरम्यान धारबांदोडामध्ये सर्वाधिक ६६.९० इंच पावसाची नोंद झाली आहे. सांगे येथे ५६.४६ इंच, वाळपईमध्ये ५३.८३ इंच, तर फोंडामध्ये ५२.९६ इंच पावसाची नोंद झाली आहे.