न्यायालयाच्या निर्देशानंतर कारवाई : शिरवई-केपेत लाखोंची फसवणूक
पणजी : शिरवई-केपे येथील सर्व्हे क्रमांक १०९/१, १०९/२ आणि १०९/३ मधील जमीन सरकारी असल्याची माहिती असूनही, स्वतःला कायदेशीर मालक म्हणून भासवून भूखंडांची विक्री करण्यात आली. याप्रकरणी केपे पोलिसांनी संशयित योगेश कुंकळ्येकर, प्रमोद कुंकळ्येकर आणि परेश कुंकळ्येकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
केपेचे मामलेदार नेथन आफोंसो यांनी या प्रकरणी तक्रार दाखल केली होती. त्यानुसार, शिरवई-केपे येथील सर्व्हे क्र. १०९/१ मधील ४,४७५ चौ.मी., १०९/२ मधील २,५२५ चौ.मी. आणि १०९/३ मधील ७,००० चौ.मी. अशी एकूण १४००० चौ.मी. सरकारी जमीन हडप केल्याचे म्हटले आहे.
या प्रकरणाचा उलगडा एका न्यायालयीन याचिकेनंतर झाला. शिरवई-केपे येथील याच सर्व्हे क्रमांकांच्या जमिनींमध्ये बेकायदेशीर बांधकाम होत असल्याचा दावा करत विशांता शिरवईकर यांनी १७ जानेवारी २०२५ रोजी गोवास्थित मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्यायालयाने ५ मार्च २०२५ रोजी केपेच्या मामलेदारांना सहा महिन्यांत बांधकामाची तपासणी करून कारवाई करण्याचे आदेश दिले होते.
तक्रारीनुसार, संशयित कुंकळ्येकर यांनी ही जमीन जाणूनबुजून डॉ. काशीनाथ वसंत शिरवईकर आणि त्यांच्या पत्नी संगीता शिरवईकर यांच्याकडून खरेदी केली. विशेष म्हणजे, शिरवईकर दाम्पत्याचे निधन झाले आहे. त्यानंतर १७ ऑक्टोबर १९९६ ते २१ डिसेंबर २००९ या कालावधीत संशयितांनी स्वतःला जमिनीचे कायदेशीर मालक म्हणून सादर करून हे भूखंड विकले आणि सरकारची फसवणूक केली.
या निर्देशानंतर, केपेच्या मामलेदारांनी जमिनीची पाहणी केली असता, संबंधित जमीन सरकारी असल्याचे समोर आले. त्यानंतर केपेच्या उपजिल्हाधिकाऱ्यांनी बांधकामधारकांची सुनावणी घेतली असता, त्यांनी ही जमीन संशयित कुंकळ्येकर यांच्याकडून विकत घेतल्याचे आणि त्यासंबंधीची विक्रीपत्रे केपेच्या उपनिबंधकाकडे नोंदणी केल्याचे समोर आले. अधिक चौकशीत या जमिनीतून एकूण १२ विक्रीपत्रे नोंदणी झाल्याचे निदर्शनास आले. याची दखल घेऊन मामलेदार नेथन आफोंसो यांनी मे महिन्यात तक्रार दाखल केली.
पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यास विलंब
या तक्रारीवर गुन्हा दाखल करण्यास पोलिसांनी सुरुवातीला टाळाटाळ केल्याचेही समोर आले. त्यानंतर दक्षिण गोवा पोलीस अधीक्षक टिकमसिंग वर्मा यांनी कायदेतज्ञांकडून सल्ला घेतल्यानंतर, २३ जून २०२५ रोजी केपे पोलिसांनी योगेश कुंकळ्येकर, प्रमोद कुंकळ्येकर आणि परेश कुंकळ्येकर यांच्या विरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम ४६५, ४६८, ४७१, ४२० आरडब्ल्यू ३४ अंतर्गत गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. केपेचे पोलीस निरीक्षक अर्जुन सांगोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली महिला उपनिरीक्षक जॉयसी कार्व्हालो या प्रकरणाचा तपास करत आहेत.