जिल्हा निबंधकांचा आदेश : गोविंद गावडे समर्थक गटाला धक्का
प्रतिनिधी। गोवन वार्ता
मडगाव : ‘उटा’ या अनुसूचित जमाती (एसटी) संघटनेची सार्वत्रिक निवडणूक सप्टेंबर २०२५ मध्ये होणार आहे. तोपर्यंत सध्याच्या विद्यमान कार्यकारिणीने कोणतीही सभा घेऊ नये, आर्थिक व्यवहार करू नयेत, असा आदेश दक्षिण गोवा जिल्हा निबंधक सूरज वेर्णेकर यांनी दिला आहे. या आदेशामुळे गोविंद गावडे यांचे कट्टर समर्थक असलेल्या प्रकाश वेळीप यांच्या गटाला मोठा धक्का बसला आहे.
‘उटा’ या एसटी समाजासाठी कार्यरत संघटनेची विद्यमान कार्यकारिणी बेकायदेशीर आहे, अशी तक्रार एसटी समाजाशी संबंधित असलेल्या सहा संघटनांनी दक्षिण गोवा जिल्हा निबंधकांसमोर केली आहे. या याचिकेवर शुक्रवारी सुनावणी झाली. एसटी समाजाच्या विकासासाठी कार्यरत ‘उटा’ संस्थेची सध्याची कार्यकारिणी बेकायदेशीर असून या समितीला पुढील कामकाज करण्यापासून रोखावे यासाठी एसटी समाजाशी संबंधित असलेल्या ‘गाकुवेध’ फेडरेशनसह ट्रायबल वेल्फेअर असोसिएशन, ऑल गोवा शेड्यूल ट्रायब्स युनियन, गौड जमात महासंघ, ताळगाव ट्रायबल वेल्फेअर असोसिएशन या संघटनांबरोबरच गोमंतक गौड समाज संघटनेतर्फे सदस्य शंकर गावकर यांनी दक्षिण गोवा जिल्हा निबंधकांसमोर दावा दाखल केला आहे. त्यावर दक्षिण गोवा जिल्हा निबंधक सूरज वेर्णेकर यांच्यासमोर सुनावणी झाली. यावेळी प्रतिवादी असलेले उटाचे अध्यक्ष प्रकाश वेळीप, तसेच दुर्गादास गावडे आणि नानू बांदोडकर यांनी लेखी स्वरूपात आपली बाजू मांडली. यावेळी अर्जदार संघटनांच्या वतीनेही बाजू मांडण्यात आली. संबंधित सहा संघटनांनी जिल्हा निबंधक कार्यालयात जो दावा सादर केला होता, त्यात ‘उटा’च्या विद्यमान समितीला बरखास्त करून त्या जागी प्रशासकाची नेमणूक करावी आणि जोपर्यंत हा दावा निकाली लागत नाही, तोपर्यंत उटाचा शिक्का आणि अन्य कागदपत्रांचा वापर करण्यापासून या समितीला प्रतिबंध करावा, अशी मागणी केली होती.
या याचिकेवर शुक्रवारी सुनावणी झाली. संस्थेच्या घटनेनुसार ‘उटा’ संघटनेच्या कोणत्याही पदाधिकार्याला दोन टर्मपेक्षा जास्त कालावधी समितीवर राहता येणार नाही. मात्र, अध्यक्ष प्रकाश वेळीप यांच्यासह आणखी काहीजण दोन टर्मपेक्षा जास्त कार्यकाळ संस्थेवर पदाधिकारी म्हणून कार्यरत आहेत. यात संस्थेच्या घटनेतील नियमांचे उल्लंघन आढळून आले आहे. प्रकाश वेळीप हे २००७ पासून अध्यक्षपदी आहेत. तसेच सप्टेंबर २०२५ मध्ये संस्थेच्या सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. त्यामुळे जिल्हा निबंधक सूरज वेर्णेकर यांनी सध्या अंतरिम आदेश जारी करत अंतिम निर्णय होईपर्यंत ‘उटा’च्या कार्यकारिणीला संस्थेचे काम करण्यास किंवा आर्थिक व्यवहार करण्यास मनाई केली आहे.
काही सदस्य दोनपेक्षा जास्त टर्म कार्यकारिणीवर : शिरोडकर
शिरोडकर यांनी सांगितले की, एसटी समाजाच्या विकासासाठी २००४ मध्ये आठ एसटी संघटनांनी मिळून ‘उटा’ संघटनेची स्थापना केली होती. संस्थेचे पदाधिकारी म्हणून जास्तीत जास्त दोन टर्म राहता येते; पण काही सदस्य दोनपेक्षा जास्त टर्म कार्यकारिणीवर आहेत. यामुळे जिल्हा निबंधकांकडे याचिका दाखल करून न्याय मागितला. आता निवडणुका होईपर्यंत संस्थेच्या कार्यकारिणीला कोणतेही काम करण्यास, आर्थिक व्यवहार करण्यास बंदी घातली आहे, अशी माहिती गाकुवेधचे अध्यक्ष गोविंद शिरोडकर यांनी दिली. यावेळी याचिकादार शंकर गावकर, रवींद्र गावकर उपस्थित होते.