माशेल, व्हिजनरी, अष्टगंधामध्ये ७५ कोटींचा घोटाळा

१० हजारांहून अधिक ठेवीदारांचे भवितव्य धोक्यात

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
13 hours ago
माशेल, व्हिजनरी, अष्टगंधामध्ये ७५ कोटींचा घोटाळा

पणजी : आर्थिक गैरव्यवहारांमुळे संकटात सापडलेल्या माशेल महिला, व्हिजनरी आणि अष्टगंधा क्रेडिट सोसायट्यांमध्ये एकूण १०,५८७ ठेवीदारांचे सुमारे ७५ कोटी रुपये अडकले आहेत. या क्रेडिट सोसायट्या बंद पडण्याच्या मार्गावर असल्याने ठेवीदारांचे भवितव्य अंधारात आहे. माशेल महिला क्रेडिट सोसायटीचे ऑडिट सध्या सुरू असून, नेमका ठेवींचा आकडा स्पष्ट व्हायचा आहे, अशी माहिती सहकार निबंधक खात्याच्या अधिकाऱ्यांनी दिली.

या तिन्ही सोसायट्यांच्या आर्थिक गैरव्यवहारांची चौकशी आर्थिक गुन्हे शाखा (ईओसी) करत आहे. येत्या सहा महिन्यांत या प्रकरणाचा निर्णय अपेक्षित आहे, असे सहकार मंत्री सुभाष शिरोडकर यांनी सांगितले. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून या सोसायट्यांची मालमत्ता सरकार जप्त करणार असून, त्यानंतर ठेवीदारांना पैसे परत दिले जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

सहकार खात्याच्या माहितीनुसार, अष्टगंधा क्रेडिट सोसायटीत ४,२०४ ठेवीदारांचे ११ कोटी २ लाख रुपये अडकले आहेत. व्हिजनरी क्रेडिट सोसायटीत ५,१८५ ठेवीदारांचे ४२ कोटी रुपये गुंतले आहेत. माशेल महिला क्रेडिट सोसायटीत १,१९१ ठेवीदारांचे अंदाजे २२ कोटी रुपये गुंतले असून सदर ऑडिट सुरू अाहे. ऑडित झाल्यानंतर ठेवींचा आकडा निश्चित होणार आहे. 
सहकार कायद्यानुसार कारवाई सुरू असून, मालमत्ता जप्त करण्यासाठी नोटिसा पाठवण्याची प्रक्रिया चालू आहे. मात्र, सर्व ठेवीदारांना त्यांचे पैसे मिळतील, अशी हमी सध्यातरी देता येत नाही, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
सोसायटीनिहाय ठेवीदारांची आकडेवारी
अष्टगंधा : ४,२०४ ठेवीदारांचे ११ कोटी २ लाख रुपये.
व्हिजनरी : ५,१८५ ठेवीदारांचे ४२ कोटी रुपये. : १,१९१ ठेवीदारांचे अंदाजे २२ कोटी रुपये.
माशेल