पतीसह तिघांविरोधात गुन्हा
कुडाळ : नेरूर-रावलेवाडी येथे एका नवविवाहितेने सासरच्या छळाला कंटाळून स्वतःवर पेट्रोल ओतून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. अंकीता रणबीर कदम (वय ३०) असे या पीडित विवाहितेचे नाव असून, ती गंभीर भाजल्यामुळे तिच्यावर ओरोस येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
ही घटना २ जुलै रोजी मध्यरात्री १२ वाजण्याच्या सुमारास घडली. अंकिताच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून पती रणबीर प्रकाश कदम (वय ३५, रा. खांदरवाडी-नाटळ), सासरे प्रकाश गणपत कदम (वय ७०) व सासू यांच्या विरोधात कुडाळ पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारीनुसार, अंकिताचा सासरच्या घरी सातत्याने छळ केला जात होता. २ जुलै रोजी तिचे सासरे प्रकाश कदम यांनी तिला रिक्षाने माहेरी आणून सोडले व ही (अंकीता) काही काम करत नाही, हिला इथेच ठेवा, असे सांगून ते निघून गेले. त्यानंतर रात्री अंकिताने आत्मदहनाचा प्रयत्न केला. या प्रकरणी तिघांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास महिला सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक वैशाली आडकुर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. अंकिताची प्रकृती अत्यवस्थ असून, तिचा जीव वाचवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.