देशात जुलैमध्ये सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज

आयएमडीचा अहवाल : उष्णतेपासून दिलासा, काही भागांत कमी पावसाची शक्यता

Story: न्यूज डेस्क । गाेवन वार्ता |
01st July, 08:37 pm
देशात जुलैमध्ये सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज

नवी दिल्ली : भारतीय हवामान खात्याने (आयएमडी) जुलै महिन्यासाठी महत्त्वाचा अंदाज वर्तवला आहे. यानुसार, देशाच्या बहुतांश भागांमध्ये जुलै महिन्यात सरासरीपेक्षा जास्त पावसाची नोंद होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे नागरिकांना उष्णतेपासून दिलासा मिळेल आणि तापमान सामान्यपेक्षा कमी राहील. मात्र, ईशान्य व पूर्व भारतातील बहुतांश भाग, दक्षिणेकडील काही टोकाचे परिसर आणि वायव्य भारतातील काही भागांत पर्जन्यवृष्टी सरासरीपेक्षा कमी राहण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
भारत हवामान खात्याचे महासंचालक डॉ. मृत्युंजय महापात्र यांनी सांगितले की, जुलै २०२५ मध्ये पावसाचे प्रमाण दीर्घकालीन सरासरीच्या १०६ टक्क्यांहून अधिक असण्याची शक्यता आहे. अधिक पाऊस शेती व जलस्रोतांसाठी फायदेशीर ठरेल, मात्र यामुळे पूर, भूस्खलन, वाहतुकीत अडथळे आणि आरोग्याच्या समस्या देखील निर्माण होऊ शकतात. त्यामुळे प्रशासनाने आणि नागरिकांनी हवामान विभागाच्या पूर्वसूचनांवर लक्ष ठेवून सतर्क राहावे.
जुलैमध्ये बहुतांश भागात चांगला पाऊस अपेक्षित असला तरी, ईशान्य भारत, पूर्व भारत, दक्षिण द्वीपकल्पाचा काही भाग आणि वायव्य भारताच्या काही भागांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तापमानाच्या बाबतीत, देशातील अनेक भागांमध्ये किमान तापमान सामान्य किंवा त्यापेक्षा कमी राहण्याचा अंदाज आहे. मात्र, ज्या भागांत कमी पावसाचा अंदाज आहे, तिथे तापमान सामान्यपेक्षा जास्त राहू शकते.
जूनमधील मान्सूनची स्थिती
जून २०२५ मध्ये देशात सरासरीपेक्षा ९ टक्के जास्त पावसाची नोंद झाली. मात्र, त्याचे वितरण असमान होते. पूर्व भारतात (-१६.९ टक्के) आणि दक्षिण भारतात (-२.७ टक्के) पावसाचे प्रमाण कमी होते, तर वायव्य भारतात (४२.२ टक्के) आणि मध्य भारतात (२४.८ टक्के) अतिरिक्त पावसाची नोंद झाली आहे. मान्सूनचे आगमन २४ मे रोजी लवकर झाले आणि ४ जूनपर्यंत तो देशाच्या निम्म्या भागात पोहोचला. मात्र, त्यानंतर दोन आठवड्यांचा खंड पडला आणि गेल्या दोन आठवड्यांत कमी दाबाच्या क्षेत्रांमुळे जोरदार पाऊस झाला.
शेती, जलस्रोतांसाठी फायदेशीर
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, जुलै २०२५ मध्ये देशभरातील एकूण मासिक पर्जन्यमान दीर्घकालीन सरासरीच्या (एलपीए) १०६ टक्क्यांपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे. सामान्यतः जुलै महिन्यात देशभरात सुमारे २८० मिमी पावसाची नोंद होते. हा अतिरिक्त पाऊस शेती आणि देशातील जलस्रोतांसाठी अत्यंत फायदेशीर ठरू शकतो.

हेही वाचा