'या' बँकांनी एटीएम शुल्क वाढवले, आता व्यवहार करा जपून!
पणजीः १ जुलै म्हणजेच आजपासून देशभरात अनेक नवीन आर्थिक आणि प्रशासकीय नियम लागू होत आहेत. यामध्ये बँकिंग, ट्रेन तिकीट बुकिंग, एलपीजी सिलेंडरची किंमत, पॅन कार्ड अर्ज, यूपीआय चार्जबॅक आणि जीएसटी रिटर्नशी संबंधित मोठे बदल समाविष्ट आहेत. हे नियम केवळ तुमच्या दैनंदिन जीवनासह तुमच्या खिशावरही थेट परिणाम करतील. १ जुलैपासून कोणते महत्त्वाचे बदल होणार आहेत ते सविस्तरपणे जाणून घेऊया.
नवीन पॅन कार्ड काढण्यासाठी आधार आवश्यक
केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ (सीबीडीटी) नुसार, १ जुलैपासून नवीन पॅन कार्ड (PAN Card) बनवण्यासाठी आधार पडताळणी अनिवार्य करण्यात आली आहे. आता फक्त ओळखपत्र किंवा जन्म प्रमाणपत्र देऊन काम भागणार नाही. या बदलामुळे कर प्रणालीमध्ये पारदर्शकता वाढेल आणि बनावट पॅन कार्ड बनवणाऱ्यांना आळा बसेल.
एटीएम आणि बँकिंग शुल्कात वाढ
अॅक्सिस बँक आणि आयसीआयसीआय बँकेने (Bank) एटीएममधून पैसे काढण्याचे शुल्क वाढवले आहे. आयसीआयसीआयमध्ये ५ मोफत व्यवहारांनंतर, प्रति व्यवहार २३ रुपये आकारले जातील, तर आंतरराष्ट्रीय एटीएममध्ये, १२५ रुपये अधिक ३.५% चलन रूपांतरण शुल्क भरावे लागेल. आयएमपीएस व्यवहार आणि शाखेत रोख रक्कम जमा/काढण्यासाठी देखील नवीन शुल्क लागू होतील.
आयटीआर दाखल करण्याच्या अंतिम तारखेत बदल
करदात्यांना दिलासा देत, आयकर विभागाने आयटीआर भरण्याची अंतिम तारीख ३१ जुलै वरून १५ सप्टेंबर पर्यंत वाढवली आहे. यामुळे लोकांना घाई न करता त्यांचे रिटर्न योग्यरित्या भरता येतील.
जीएसटी रिटर्न भरण्यावर बारकाईने लक्ष
१ जुलैपासून GSTR-३B फॉर्म एडिट करता येणार नाही, असे GSTN ने स्पष्ट केले आहे. तसेच, तीन वर्षांपेक्षा जुने रिटर्न आता दाखल करता येणार नाहीत. हा नियम GSTR-१, ३B, ४, ५, ६, ७, ८ आणि ९ वर लागू होईल. यामुळे वेळेवर रिटर्न भरण्याची सवय वाढेल.
एलपीजी सिलेंडरच्या नवीन किमती
१ जुलै म्हणजेच आजपासून घरगुती आणि व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या किमतीत बदल होईल. जूनमध्ये व्यावसायिक सिलिंडर स्वस्त झाले होते, आता घरगुती सिलिंडरच्या किमतीतही बदल होण्याची अपेक्षा आहे. तसेच, विमान टर्बाइन इंधनाचे दर देखील बदलू शकतात, ज्याचा हवाई तिकिटांवर परिणाम होईल.
आरक्षण चार्ट आठ तास आधीच होणार तयार
आतापर्यंत ट्रेन रवाना होण्याच्या चार तास आधी आरक्षण चार्ट जारी केला जात होता. पण यामध्ये आता रेल्वेने बदल केला आहे, कारण वेटिंग लिस्ट असलेल्या प्रवाशांना यामुळे खूप त्रास होत होता. आता १ जुलैपासून आरक्षण चार्ट आठ तास आधीच तयार केला जाईल. यानुसार जर तुमची ट्रेन दुपारी १ वाजता सुटत असेल तर आदल्या रात्री ८ वाजताच तो तयार होऊन जारी केला जाईल.