गोवा सरकारला लवकरच संरक्षण खात्याची जागा मिळणार

संरक्षण मंत्र्यांकडून सकारात्मक संकेत; मुख्यमंत्र्यांची दिल्ली दौऱ्यात चर्चा

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
5 hours ago
गोवा सरकारला लवकरच संरक्षण खात्याची जागा मिळणार

पणजी : पणजीच्या मध्यवर्ती भागात संरक्षण खात्याची जागा गोवा सरकारला मिळावी यासाठी दिल्लीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंग (Defence Minister Rajnath Singh) यांची भेट घेतली. मंत्री राजनाथ सिंग याबाबत सकारात्मक असून ही जागा लवकरच गोवा सरकारला मिळेल, अशी अपेक्षा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Chief Minister Dr. Pramod Sawant) यांनी व्यक्त केली. मंगळवारी त्यांनी बँकांसाठी आयोजित केलेल्या कार्यशाळेच्या उद्घाटनानंतर माध्यमांशी संवाद साधला. मात्र यावेळी त्यांनी मंत्रिमंडळ बदलाबाबत कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.

 

(बँकांसाठी आयोजित कार्यशाळेचे उद्घाटन करताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत. सोबत अन्य.) 

मुख्यमंत्री म्हणाले की, दिल्लीमध्ये विविध केंद्रीय नेत्यांच्या भेटी घेऊन गोव्यासंबंधित विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. उद्योग मंत्री पियूष गोयल (commerce and industry minister piyush goyal) यांच्या सोबत 'अपेडा' (कृषी आणि अन्न उत्पादन निर्यात व विकास प्राधिकरण) आणि केंद्रीय उद्योग मंत्रालयाचे गोव्यात क्षेत्रीय कार्यालय सुरू करण्याबाबत चर्चा करण्यात आली. याबाबत आमचे प्रयत्न सुरू असून ही कार्यालये लवकरच सुरू होतील. ही कार्यालय सुरू झाल्यास गोव्यातील उद्योग क्षेत्र आणि व्यापाऱ्यांना फायदा होणार आहे.

याशिवाय होंडा येथील हेलिकॉप्टर रिपेअर प्रकल्प लवकर सुरू करण्याबाबत चर्चा झाली. हा प्रकल्प गोव्यासाठी महत्त्वाचा असून या प्रकल्पामुळे गोव्यात रोजगार निर्मिती होणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Union Home Minister Amit Shah) यांनी नेहमीच आम्हाला राजकीय व राज्यातील अन्य विषयांवर मार्गदर्शन केले आहे. यासाठीच काल दिल्लीमध्ये मी आणि आमदार मायकल लोबो यांनी त्यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत राजकीय घडमोडींसह विविध विषयांसोबत चर्चा झाल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. 

आलेक्स सिक्वेरा यांना लवकरच डिस्चार्ज
दिल्लीत आम्ही मंत्री आलेक्स सिक्वेरा यांची भेट घेतली. त्यांची प्रकृती सध्या चांगली आहे. पुढील चार ते पाच दिवसात त्यांना डिस्चार्ज देण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

हेही वाचा