संततधार पावसामुळे धरणातील पाणीसाठा समाधानकारक
पणजी : यंदा राज्यात मान्सूनचे (monsoon) आगमन २५ मे रोजी झाले होते. मान्सूनपूर्व आणि मान्सून उत्तर काळात काही दिवस मुसळधार पावसाची नोंद झाली. मात्र जूनच्या मध्यानंतर संततधार पावसाची नोंद झाली. राज्यात १ ते ३० जून दरम्यान सरासरी ३१.२९ इंच पावसाची नोंद झाली आहे. यंदा पावसाचे प्रमाण १३ टक्क्यांनी कमी आहे. मागील वर्षी याच कालावधीत सरासरी ३५.९९ इंच पावसाची नोंद झाली होती. असे असले तरी राज्यात झालेल्या संततधार पावसामुळे धरणातील पाणीसाठा समाधानकारक आहे.
सोमवारी राज्यात ऊन-पावसाचा खेळ सुरूच होता. अधूनमधून येणाऱ्या पावसाच्या सरी सोडल्या, तर दिवसभर कडक ऊन पडले होते. हवामान खात्याने राज्यात १ ते ६ जुलै दरम्यान मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता गृहित धरून या सहा दिवसांसाठी पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. राज्यात चोवीस तासात सरासरी ०.७१ इंच पाऊस पडला. यादरम्यान फोंडामध्ये १.६५ इंच, सांगेमध्ये १.३१ इंच, धारबांदोडात १.२५ इंच पावसाची नोंद झाली.
पावसाने दडी मारल्याने राज्यातील कमाल तापमान वाढ झाली. सोमवारी पणजीत कमाल ३२ अंश, तर किमान २५.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. मुरगावमधील कमाल तापमान ३०.६ अंश, तर किमान तापमान २६.६ अंश सेल्सिअस राहिले. पुढील पाच दिवस राज्यातील कमाल तापमान ३० ते ३१ अंश, तर किमान तापमान २५ ते २६ अंश सेल्सिअसपर्यंत राहण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.
दोन धरणे १०० टक्के भरली
राज्यातील सहापैकी पाच धरणांतील पाणीसाठा समाधानकारक आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ३० जून अखेरीस साळावली धरणात १०४ टक्के, गवाणे १०० टक्के, पंचवाडी ९१ टक्के, चापोली ७३ टक्के, अंजुणे धरणात ३० टक्के पाणी साठा शिल्लक होता. तिळारीमध्ये ७१ टक्के पाणी साठा शिल्लक होता. आमठाणे धरणात केवळ ६ टक्के पाणीसाठा शिल्लक होता.