४ महिन्यात एफडीएकडून २ लाख माशांच्या नमुन्यांची चाचणी, सर्व चाचण्या निगेटिव्ह : विश्वजित राणे
पणजी : अन्न व औषध प्रशासन संचालनालयाने मार्च ते जून या चार महिन्यात फॉर्मालीनसाठी २ लाख माशांच्या नमुन्यांची तपासणी केली आहे. सर्व अहवाल निगेटिव्ह आल्याने गोवेकरांना फॉर्मेलिनमुक्त व दर्जेदार मासळीचा पुरवठा होत आहे, असे अन्न व औषध प्रशासन खात्याचे मंत्री विश्वजित राणे यांनी ट्विट करून सांगितले आहे. गोव्यात फॉर्मेलिनयुक्त मासळीचा पुरवठा होत असल्याचा आरोप अधूनमधून होत असतो. या आरोपांच्या अनुषंगाने त्यानी ही माहिती दिली.
सात वर्षापूर्वी मासळीमध्ये फॉर्मेलिनचे अंश सापडल्याने राज्यात खळबळ उडाली होती. २०१९नंतर क्वालिटी कंट्रोल ऑफ इंडियाच्या (क्यूसीआय) च्या सहकार्याने पोळे व पत्रादेवी येथील चेकनाके तसेच मडगाव मासळी मार्केटमध्ये माशांची तपासणी होत आहे. २०१९ नंतर पोळे येथे ३३८०५ नमुने, पत्रादेवी येथे ३३९८९ नमुने तर मडगाव मासळी मार्केटमध्ये १३२७१७ नमुन्यांची तपासणी झाली आहे.
याशिवाय अन्न व औषध प्रशासनातर्फे (एफडीए) प्रयोगशाळेतही माशांची तपासणी केली जाते. माशांची तपासणी होणाऱ्या प्रयोगशाळेत अत्याधुनिक उपकरणे आहेत. या उपकरणांच्या आधारे माशांची तपासणी होत आहे. एकाही नमुन्यामध्ये फॉर्मेलिन सापडलेले नाही, असे एफडीए खात्याचे मंत्री विश्वजित राणे म्हणाले.