दूधसागर ट्रेकिंगवर बंदी असूनही २१ पर्यटक रेल्वे रुळांवर

केसलरॉक रेल्वे बोगदद्याजवळ आरपीएफ जवानांनी घेतले ताब्यात

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
7 hours ago
दूधसागर ट्रेकिंगवर बंदी असूनही २१ पर्यटक रेल्वे रुळांवर

जोयडा : कर्नाटकातील केसलरॉक येथून दूधसागर धबधब्यावर ट्रेकिंग करून जाणाऱ्या २१ पर्यंटकांना रेल्वे सुरक्षा दलाच्या (आरपीएफ) जवानांनी ताब्यात घेऊन केसलरॉक रेल्वे पोलीस स्थानकात गुन्हा नोंद केला आहे.

कर्नाटकातील केसलरॉक येथून ट्रेकिंग करून दूधसागर धबधब्यावर जाण्यास सुरक्षतेच्या कारणास्तव दक्षिण पश्चिम रेल्वे विभागाने बंदी घातली आहे. असे असतानाही रविवारी बेळगाव, हुबळी, बेंगळुर येथील पर्यटक यशवंतपूर - वास्को द गामा एक्सप्रेसने प्रवास करून केसलरॉक रेल्वे स्थानकात उतरून पुढे दूधसागर धबधबा पाहण्यासाठी रेल्वे मार्गाने चालत जात होते.  

बोगदद्याजवळ पर्यटकांना अडवले
काही किलोमीटर चालत गेल्यानंतर रेल्वे बोगदद्याजवळ पर्यटकांना रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांनी त्यांना अडवले. त्यावेळी पर्यटकांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यावेळी त्यांना ताब्यात घेण्यात आले.

जामिनावर सुटका 
केसलरॉक ते दूधसागर धबधब्यापर्यंत रेल्वे मार्गांवर बोगदे, उंच दऱ्या, डोंगर, वन्य प्राणी तसेच दरड कोसळण्याची शक्यता असल्याने सुरक्षतेच्या कारणास्तव यामार्गे दूधसागर येथे जाण्यास बंदी घातली आहे. असे असतानाही पर्यटक रेल्वे रुळावरून दूधसागर धबधब्याकडे जाण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसून येते. रविवारी अटक करण्यात आलेल्या २१ पर्यटकांची सोमवारी जामिनावर सुटका करण्यात आली आहे.