मस्क यांच्या 'अमेरिका पार्टी' स्थापनेच्या इशाऱ्यानंतर ट्रम्प आक्रमक
वॉशिंग्टन : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि टेस्लाचे सीईओ एलन मस्क यांच्यातील शाब्दिक युद्ध पुन्हा एकदा शिगेला पोहोचले आहे. मस्क यांनी ट्रम्प यांच्या नवीन कर आणि खर्च विधेयकावर तीव्र टीका केल्यानंतर, ट्रम्प यांनी मस्क यांना थेट इशारा दिला आहे की, दुकान बंद करून दक्षिण आफ्रिकेला (मस्क यांचे मूळ राष्ट्र) परत जावे लागेल.
मस्क यांनी ट्रम्प यांच्या नव्या कर व खर्च विधेयकाला 'बिग ब्युटीफुल बिल' असे संबोधले आहे. हे विधेयक मंजूर झाल्यास, दुसऱ्याच दिवशी 'अमेरिका पार्टी' स्थापन करण्याची धमकी मस्क यांनी दिली आहे. अलीकडेच त्यांनी 'एक्स'वर घेतलेल्या एका पोलमध्ये जनतेने नवीन पक्षाला पाठिंबा दर्शवला होता. मस्क यांच्या मते, डेमोक्रॅट्स आणि रिपब्लिकनशिवाय जनतेला इतर पर्याय उपलब्ध असावेत. मस्क यांनी दावा केला की, ट्रम्प सरकारचे नवीन कर विधेयक अमेरिकेतील लाखो नोकऱ्या हिरावून घेईल आणि मोठे आर्थिक नुकसान करेल. त्यांनी या विधेयकाला 'वेडेपणाचे आणि विध्वंसक' म्हटले.
नवीन कर आणि खर्च विधेयकामुळे इलेक्ट्रिक वाहनांसाठी असलेला ७,५०० चा लोकप्रिय ग्राहक कर क्रेडिट संपुष्टात येणार आहे, ज्यामुळे इलेक्ट्रिक वाहने महाग होतील. याचा थेट फटका मस्कच्या कंपनीला बसणार आहे. दरम्यान, ट्रम्प यांनी यापूर्वीही इलेक्ट्रिक वाहन धोरणांना विरोध केला होता.
ट्रम्प यांचे मस्कला प्रत्युत्तर
ट्रम्प यांनी 'ट्रुथ सोशल'वर पोस्ट करत मस्कला प्रत्युत्तर दिले. त्यांनी म्हटले की, टेस्लाचे सीईओ खर्च कमी करणाऱ्या विभागाचे नेतृत्व करतात. त्यांनी सरकारी अनुदानांवर आणि करारांवर एक नजर टाकावी. मस्क यांना कदाचित जास्त अनुदान मिळत असेल. अनुदानाशिवाय मस्क यांना कदाचित दुकान बंद करून दक्षिण आफ्रिकेला परत जावे लागेल. यापुढे रॉकेट प्रक्षेपण, उपग्रह किंवा इलेक्ट्रिक कार उत्पादन नाही. आपला देश खूप पैसे वाचवू शकेल.