मंडीत ढगफुटी, मुसळधार पावसाने हाहाकार

४ ठार, १६ बेपत्ता : ९९ जणांना वाचवण्यात यश, बियास नदीला पूर

Story: न्यूज डेस्क । गाेवन वार्ता |
01st July, 11:46 pm
मंडीत ढगफुटी, मुसळधार पावसाने हाहाकार

शिमला (मंडी) : हिमाचल प्रदेशातील मंडी जिल्ह्यात सोमवारी रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आणि सलग ढगफुटीच्या घटनांमुळे मोठी हानी झाली आहे. आतापर्यंत ४ जणांच्या मृत्यूची पुष्टी झाली असून, १६ लोक बेपत्ता असल्याची माहिती आहे. जिल्हा प्रशासन आणि एसडीआरएफच्या पथकांनी संयुक्त बचावकार्यात ९९ लोकांना सुरक्षित वाचवले आहे.
मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी भूस्खलनाच्या घटना घडल्या आहेत. यामुळे किरतपूर-मनाली महामार्गावरील मंडी ते कुल्लू दरम्यानचे अनेक भाग बंद झाले आहेत. अनेक गावांमध्ये पाणी साचले असून, घरांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
हिमाचल प्रदेशातील मंडीमध्ये जोरदार पावसामुळे बियास नदी दुथडी भरून वाहत आहे. प्रशासनाने पूरग्रस्त भागांत अलर्ट जारी केला असून, मदतकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. हवामान विभागाने पुढील ४८ तासांत आणखी पावसाचा इशारा दिला आहे, ज्यामुळे परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे. बाधित क्षेत्रांमध्ये २० हून अधिक घरे कोसळली आहेत आणि अनेक पूल वाहून गेल्याने संपर्क मार्ग पूर्णपणे तुटले आहेत.
ढगफुटीने स्यांज गाव उद्ध्वस्त, ९ बेपत्ता
सराज विधानसभा मतदारसंघातील गोहर उपविभागातील स्यांज गावात सोमवारी रात्री उशिरा ढगफुटीची घटना घडली. या ढगफुटीमुळे संपूर्ण गाव हादरले. मुसळधार पाऊस आणि अचानक वेगाने आलेल्या ढिगाऱ्याखाली अनेक घरे दबली गेली. या घटनेत महिला आणि मुलांसह ९ ग्रामस्थ बेपत्ता झाले आहेत.

हेही वाचा