राजधानी दिल्लीतील प्रकार : ‘विधवा पेन्शन’ योजनेसाठी खटाटोप
नवी दिल्ली : आर्थिक दुर्बल घटकांना मदत करण्यासाठी सरकारच्या विविध योजना असतात, पण काही जण नियम धाब्यावर ठेवून त्यांचा गैरफायदा घेतात. असाच एक धक्कादायक प्रकार राजधानी दिल्लीत समोर आला आहे. दिल्ली सरकारकडून विधवा महिलांना दिल्या जाणाऱ्या मासिक पेन्शन योजनेत तब्बल ६० हजार महिलांनी नियमांमध्ये नसतानाही लाभ घेतल्याचे एका सरकारी सर्वेक्षणातून उघड झाले आहे. या महिलांचा नवरा जिवंत असतानाही त्यांनी ‘विधवा पेन्शन’चा लाभ घेतल्याचे समोर आले आहे. आता सरकारकडून या योजनेचे पुन्हा फेर-सर्वेक्षण करण्यात येणार आहे.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ६० हजारांहून अधिक महिलांनी चुकीच्या पद्धतीने या योजनेचा लाभ घेतला आहे. यातील काही महिलांनी त्यांचे पती जिवंत असतानाही विधवा पेन्शन योजनेचा लाभ घेतला. तर काही महिलांनी विधवा झाल्यानंतर पुन्हा लग्न केले असले तरी, त्यांनी या योजनेतून आपले नाव कमी केले नाही. नोव्हेंबर २०२४ मध्ये या संदर्भात एक सर्वेक्षण करण्यात आले होते, परंतु तरीही काही बनावट लाभार्थ्यांची नावे अजूनही समोर आलेली नाहीत.
दिल्ली सरकार थेट लाभ हस्तांतरण प्रणालीद्वारे विधवा महिलांना प्रत्येक महिन्याला २,५०० रुपये पेन्शन देते. १८ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या विधवा, घटस्फोटित, वेगळ्या राहत असलेल्या किंवा निराधार महिलांना आर्थिक मदत करण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली होती. मात्र, अनेक महिलांनी या योजनेचा गैरवापर केल्याचे आता निदर्शनास आले आहे.
घरोघरी पडताळणी मोहीम
नोव्हेंबर २०२४ मध्ये सरकारने घरोघरी जाऊन पडताळणी करण्याची मोहीम सुरू केली होती. या मोहिमेअंतर्गत अंगणवाडी सेविकांनी दिल्लीतील ११ जिल्ह्यांमधील लाभार्थ्यांच्या घरी जाऊन पडताळणी केली. या योजनेसाठी महिला लाभार्थ्यांचे वार्षिक उत्पन्न एक लाखांपेक्षा जास्त नसावे आणि अर्जदार किमान पाच वर्षे दिल्लीचा रहिवासी असावा, तसेच महिला विधवा किंवा वेगळी राहत असावी, असे स्पष्ट पात्रता निकष आहेत. या गैरव्यवहारामुळे आता सरकारवर आणि पर्यायाने सर्वसामान्यांवर आर्थिक बोजा पडत आहे.