गांजावरून झालेल्या आरोपांची भाजप प्रदेशाध्यक्षांनी घेतली दखल
प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : आजी, माजी आमदार तसेच पदाधिकाऱ्यांनी आरोप वा वक्तव्य करताना पक्षाच्या शिस्तीचा विचार केला पाहिजे. आपल्या वर्तनामुळे पक्षाची बदनामी होणार नाही, याची काळजी प्रत्येकाने घेतली पाहिजे. आगामी २०२७ च्या विधानसभा निवडणुकीत पक्षाची उमेदवारी देताना वर्तनाचाही विचार केला जाईल, असा इशारा भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी दिला. गांजावरून जे आरोप-प्रत्यारोप झाले त्याबद्दल माजी आमदार बाबू आजगावकर आणि आमदार प्रवीण आर्लेकर यांना समज देण्यात आली आहे, असेही दामू यांनी सांगितले.
पेडणेचे माजी आमदार मनोहर ऊर्फ बाबू आजगावकर आणि विद्यमान आमदार प्रवीण आर्लेकर यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. गांजा विक्रीवरून दोघांनी एकमेकांवर आरोप केले होते. या विषयी प्रसिद्ध झालेल्या बातम्यांची भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी गंभीर दखल घेतली.
विधानसभा निवडणुकीला अद्याप सुमारे दोन वर्षांचा कालावधी शिल्लक असला तरी सत्ताधारी भाजपमध्ये उमेदवारी मिळविण्यासाठी रस्सीखेच सुरू झाली आहे. त्यातूनच एकाच जागेवर इच्छुक असलेल्या नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. माजी मंत्री बाबू आजगावकर हे यापूर्वी पेडणे मतदारसंघातून विजयी झाले होते. मागील निवडणुकीत त्यांच्याएेवजी भाजपने प्रवीण आर्लेकर यांना उमेदवारी दिली. प्रवीण आर्लेकर विजयी झाले.
बाबू आजगावकर यांनी यापूर्वी प्रवीण आर्लेकरांवर गांजाच्या पुड्या विकतात, असा आरोप केला होता. कोरेगाव येथे दोन दिवसांपूर्वी त्यांनी भेट दिली. त्यावेळी ते म्हणाले, पेडणे मतदारसंघातील कायदा-सुव्यवस्था बिघडली आहे. प्रवीण आर्लेकर गांजाची विक्री करत होते, असे आरोप त्यांनी केले.
यानंतर बाबू आजगावकर यांचा मुलगा डिस्कोत गांजाची विक्री करतो. पेडण्यातील कायदा-सुव्यवस्था बिघडलेेली नाही. अॅसिड प्रकरणात संशयिताला २४ तासांत अटक केली आहे, असे आर्लेकर यांनी प्रत्युत्तर दिले होते. आपला मुलगा गांजा विकत असेल तर आर्लेकार यांनी त्याबाबतचे पुरावे सादर करावेत, असे आव्हान बाबू आजगावकर यांनी दिले. आगामी विधानसभा निवडणूक पेडणे मतदारसंघातूनच लढवणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
माजी-आजी आमदारांच्या आरोपांची चर्चा पूर्ण राज्यात सुरू आहे. बाबू आजगावकर आणि प्रवीण आर्लेकर यांच्याशी मी फोनवर बोललाे आहे. दोघांनाही समज दिली आहे. पक्षाची सगळ्यांवर नजर आहे. शिस्त मोडणाऱ्यांवर कारवाई होईल. उमेदवारी देताना वर्तनाबाबतही विचार केला जाईल, असे दोघांनाही सांगितले आहे, अशी माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी दिली.
बाबू आजगावकर आणि प्रवीण आर्लेकर यांच्याशी मी फोनवर बोललाे आहे. दोघांनाही समज दिली आहे. पक्षाची सर्वांच्या वर्तनावर नजर आहे. शिस्त मोडणाऱ्यांवर कारवाई केली जाईल. उमेदवारी देताना वर्तनाबाबतही विचार केला जाणार असल्याचे दोघांनाही सांगितले आहे.
_ दामू नाईक, प्रदेशाध्यक्ष, भाजप
पेडणे मतदारसंघातील कायदा आणि सुव्यवस्थेची घडी विस्कटली आहे. प्रवीण आर्लेकर यापूर्वी गांजाची विक्री करत होते. आगामी निवडणूक मी पेडणे विधानसभा मतदारसंघातूनच लढवणार आहे.
_ बाबू आजगावकर, माजी आमदार, पेडणे
बाबू आजगावकर यांचा मुलगा डिस्कोत गांजाची विक्री करतो. पेडण्यातील कायदा-सुव्यवस्था बिघडलेेली नाही. अॅसिड प्रकरणातील संशयिताला २४ तासांत अटक केली आहे.
_ प्रवीण आर्लेकर, आमदार, पेडणे