दिवसभर संततधार; पंचवाडी, तिळारी ‘ओव्हर फ्लो’

अनेक ठिकाणी वादळी वारे : झाडे उन्मळून वाहतूक खोळंबली


02nd July, 10:34 pm
दिवसभर संततधार; पंचवाडी, तिळारी ‘ओव्हर फ्लो’

ओव्हरफ्लो झाल्याने तिळारी धरणाच्या दरवाज्यांतून सुरू असलेला पाण्याचा विसर्ग.
प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : गेले काही दिवस राज्यात संततधार पावसाची नोंद झाली होती. बुधवारी राज्याला पावसाने झोडपून काढले. अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची नोंद झाली. यामुळे झाडे पडून नुकसानीच्या घटनांची नोंद झाली. काही ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला. काही ठिकाणी पाणी साचून राहिल्याने वाहतुकीचा खोळंबा झाला. सकाळी ८.३० ते सायं. ५.३० पर्यंत पणजीत २.४० इंच, तर मुरगावमध्ये २.२५ इंच पावसाची नोंद झाली. पावसामुळे पंचवाडी धरण दुपारी २ वाजता, तर तिळारी धरण २.५० वाजता पूर्ण क्षमतेने भरून वाहू लागले. मागील वर्षी पंचवाडी ८ जुलैला, तर तिळारी १६ जुलै रोजी भरले होते.
हवामान खात्याच्या गोवा वेधशाळेने बुधवारसाठी पावसाचा ‘यलो अलर्ट’ जारी केला होता. मात्र राज्यात जोरदार पावसाची नोंद झाली. संध्याकाळी वेधशाळेने पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला. राज्यात २४ तासांत सरासरी १.८८ इंच पावसाची नोंद झाली. यादरम्यान धारबांदोडा येथे ५.०५ इंच, सांगेत ४.०६ इंच, वाळपईत ३.६८ इंच, केपेत ३.३४ इंच, तर साखळीत २.६२ इंच पावसाची नोंद झाली. राज्यात १ जून ते २ जुलै दरम्यान सरासरी ३३.८५ इंच पावसाची नोंद झाली. यादरम्यान धारबांदोडा केंद्रात सरासरी ५०.३३ इंच, वाळपईत ४५.८८ इंच, सांगेत ४३.६२ इंच पावसाची नोंद झाली आहे.
हवामान खात्याने ३ ते ८ जुलै दरम्यान मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. यानुसार या सहा दिवसांसाठी पावसाचा ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. बुधवारी पणजीत कमाल २८ अंश, तर किमान २५.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. मुरगावमधील कमाल तापमान ३०.८ अंश, तर किमान तापमान २६ अंश सेल्सिअस राहिले. पुढील सहा दिवस राज्यातील कमाल तापमान ३१ ते ३२ अंश व किमान तापमान २५ अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता आहे.

धरणांतील २ जुलैअखेरचा पाणीसाठा (टक्क्यांत)