डेंग्यूचा डंख निष्प्रभ; रुग्णसंख्येत चारपटीने घट

उपाययोजनांत वाढ : आरोग्य खात्याच्या उपक्रमांना इतर विभागांचेही उत्तम सहकार्य


02nd July, 10:36 pm
डेंग्यूचा डंख निष्प्रभ; रुग्णसंख्येत चारपटीने घट

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : राज्यात जानेवारी ते जून २०२४ च्या तुलनेत २०२५ च्या पहिल्या सहा महिन्यात डेंग्यूच्या रुग्णांची संख्या चारपटीहून कमी झाली आहे. जानेवारी ते जून २०२४ मध्ये राज्यात डेंग्यूचे १७६ रुग्ण आढळले होते. २०२५ मध्ये याच सहा महिन्यांत डेंग्यूचे ४३ रुग्ण आढळले आहेत. डासांची उत्पत्ती होऊ नये यासाठी केल्या जाणाऱ्या मोहिमा, जागृती, घरोघरी जाऊन तपासणी करणे आदी उपाययोजनांत वाढ झाल्याने गतवर्षीच्या तुलनेत यंदा कमी रुग्ण आढळल्याची माहिती राष्ट्रीय वेक्टर बोर्न रोग नियंत्रण कार्यक्रमाच्या उपसंचालिका डॉ. कल्पना महात्मे यांनी दिली.
राज्यात जानेवारी २०२५ मध्ये ७, फेब्रुवारीमध्ये ९, मार्चमध्ये ७, एप्रिलमध्ये ६, मे महिन्यात ४, तर जूनमध्ये १० डेंग्यूचे रुग्ण आढळले होते. जून महिन्यात म्हापसामध्ये ६, कांदोळी, शिवोली, पर्वरी आणि हळदोणे येथे प्रत्येकी एक रुग्ण आढळला होता. मागील वर्षी डेंग्यू रुग्णसंख्येत वाढ झाली होती. यंदा असे होऊ नये यासाठी खात्याने गतवर्षीच्या डेंग्यू हॉटस्पॉट असणाऱ्या ठिकाणी लक्ष केंद्रित केले. खात्याने मागील वर्षी ९४८ ठिकाणी डासांच्या उत्पत्तीची केंद्रे नष्ट केली होती. यंदा जानेवारी ते मे दरम्यानच १,११७ ठिकाणी ही मोहीम राबवण्यात आली.
मागील वर्षभरात खात्याने राज्यभरातील ३.४७ लाख घरांना भेट देऊन पाहणी केली होती. यंदा मे अखेरीस १.९९ लाख घरांची पाहणी केली आहे. याशिवाय गतवर्षी ४,६१७ जागृती मोहीम करण्यात आल्या होत्या. यंदा मे अखेरीस २,५४१ मोहिमा करण्यात आल्या आहेत. पुढील काही महिन्यांत या सर्व उपाययोजनांची संख्या वाढवण्यात येणार आहे. यंदा आरोग्य खात्याला इतर खात्यांनीदेखील चांगली मदत केली. पंचायत, नगरपालिकांनी कचरा साफ आणि उचल करण्यास कामगार दिले. अशा विविध कारणांमुळे यंदा डेंग्यूचे रुग्ण कमी आढळले आहेत.
तापाच्या रुग्णांचे सर्व्हेक्षण
खात्याने प्राथमिक आरोग्य केंद्रात येणाऱ्या तापाच्या रुग्णांचे सर्व्हेक्षण सुरू केले आहे. येथे येणाऱ्या रुग्णांची लक्षणे नोंद केली जातात. एखाद्या केंद्रात अधिक रुग्ण येत असतील तर त्या भागात डेंग्यूच्या डासांची उत्पत्ती झाली असणे शक्य असते. अशा भागांची तपासणी करून येथील डासांच्या उत्पत्तीच्या केंद्रांना नष्ट केले जात आहे, असे डॉ. महात्मे यांनी सांगितले.