कामाच्या नियमांत शिथिलता : दुकानांमध्ये रात्रपाळीला परवानगी, धोकादायक कामांसाठी अधिसूचना
पणजी : महिलांना विविध क्षेत्रांत अधिक प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांना समान संधी उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. याचाच एक भाग म्हणून, महिला कामगारांवरील कामाची बंधने कमी करण्याचे प्रयत्न सरकारने केले आहेत. यानुसार दुकाने आणि आस्थापनांमध्ये महिलांना आता सायं. ७ ते पहाटे ६ पर्यंत काम करण्यास परवानगी देण्यात आली आहे. यासाठी कामगार कायद्यात आवश्यक बदल करण्यात आले आहेत.
याशिवाय कारखाने आणि बाष्पक खात्याने फॅक्टरीमध्ये धोकादायक कामांसाठी महिला कामगारांच्या नियुक्तीस परवानगी देण्याबाबत मसुदा अधिसूचना जारी केली आहे. यापूर्वी अशी कामे करण्यास महिलांना परवानगी नव्हती. नवीन मसुदा अधिसूचनेनुसार अशा ठिकाणी महिला कामगारांना पुरेशी सुरक्षा पुरवणे, त्यांचे आरोग्य चांगले राहिल यासाठी उपयोजना करणे आवश्यक आहे. कामगार खात्याने दुकाने आणि आस्थापनांमध्ये महिलांना रात्रपाळीत काम करण्यासाठी नवे बदल अधिसूचित केले आहेत.
दरम्यान, या अधिसूचनेत एक महत्त्वाचा मुद्दा स्पष्ट करण्यात आला आहे की, गर्भवती महिला आणि स्तनदा मातांना धोकादायक कामे करण्यास परवानगी दिली जाणार नाही. या मसुद्यावर आक्षेप किंवा सूचना देण्यासाठी ४५ दिवसांचा अवधी देण्यात आला आहे. यामध्ये विविध श्रेणीतील उत्पादनांचा समावेश आहे, ज्यामुळे महिलांसाठी नव्या संधी उपलब्ध होण्याची शक्यता आहे.
सरकारच्या या निर्णयामुळे महिला कामगारांना अधिक कामाच्या संधी मिळतील आणि त्या विविध क्षेत्रांत अधिक सक्रियपणे सहभागी होऊ शकतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
दुकाने, आस्थापनांसाठी अटी व शर्ती
- महिला कामगारांची रात्रपाळीत काम करण्याची लिखित स्वरूपातील मान्यता घेणे मालकास आवश्यक असेल.
- महिला काम करत असलेल्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे आणि त्यांची योग्य देखभाल करणे अनिवार्य आहे, जेणेकरून सुरक्षितता राखली जाईल.
- महिला कामगारांना त्यांच्या घरातून कामाच्या ठिकाणी आणि पुन्हा घरी सोडण्यासाठी सुरक्षित वाहतुकीची व्यवस्था करणे मालकाला आवश्यक आहे.