मराठी, महाराष्ट्राच्या हक्कांसाठी लढण्याचा ठाकरे बंधूंचा निर्धार

वरळी मुंबईत 'मराठी विजयी मेळावा' : युतीचे संकेत

Story: न्यूज डेस्क । गाेवन वार्ता |
8 hours ago
मराठी, महाराष्ट्राच्या हक्कांसाठी लढण्याचा ठाकरे बंधूंचा निर्धार

मुंबई : वरळीतील एनएससीआय डोममध्ये आयोजित 'मराठी विजयी मेळाव्यात' शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे तब्बल २० वर्षांनंतर एकाच व्यासपीठावर एकत्र आले. हिंदी सक्तीचा निर्णय राज्य सरकारने मागे घेतल्यानंतर आयोजित या मेळाव्यात ठाकरे बंधूंनी एकजुटीचे प्रदर्शन करत मराठी भाषा आणि महाराष्ट्राच्या हक्कांसाठी लढण्याचा निर्धार जाहीर केला.

यावेळी उद्धव ठाकरेंनी 'एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी' असे म्हणत मनसे-शिवसेना युतीचे स्पष्ट संकेत दिले, ज्यामुळे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सत्ताधाऱ्यांसाठी हे एक मोठे आव्हान ठरण्याची शक्यता आहे.

मेळाव्यात राज ठाकरेंनीही सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली. त्यांनी शिक्षणमंत्री दादा भुसे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शिक्षण आणि भाषेच्या मुद्द्यावरून झालेल्या चर्चेवर पलटवार केला. दादा भुसे मराठीत शिकून शिक्षणमंत्री झाले, फडणवीस इंग्रजीत शिकून मुख्यमंत्री झाले, मुळात कोण कोणत्या भाषेत शिकतो याचा काय संबंध? असा सवाल त्यांनी केला. हिंदी सक्तीचा आदेश मागे घेतल्यानंतर हे प्रकरण 'ठाकरेंची मुलं इंग्रजी माध्यमात शिकली' अशा वेगळ्या दिशेने वळवण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप राज ठाकरेंनी केला.
यावर पलटवार करताना राज ठाकरे म्हणाले, कोणा कोणाची मुलं परदेशात शिकतायत, याच्या याद्या आमच्याकडे आहेत. ते पुढे म्हणाले, आम्ही मराठी मीडियममध्ये शिकलो, आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकली, बाळासाहेब ठाकरे आणि माझे वडील श्रीकांत ठाकरे इंग्रजी मीडियममध्ये शिकलेत. या दोघांवर मराठीबद्दल शंका घेऊ शकता काय? लालकृष्ण अडवाणी ख्रिश्चन मिशनरी स्कूलमध्ये शिकले, त्यांच्या हिंदुत्वावर शंका घ्यायची का? कॉन्व्हेंट स्कूलमध्ये शिकलेले तामिळ, तेलगुच्या प्रश्नावर दक्षिण भारतात उभे राहतात. त्यांना कुठे शिकलात विचारत नाहीत. मी हिब्रू भाषेत शिकेन आणि मराठीचा कडवट अभिमान बाळगेन, असे प्रत्युत्तर त्यांनी फडणवीसांना दिले.

मराठी भाषेला कमकुवत करण्याचा डाव होता, पण आमच्या एकजुटीने तो हाणून पाडला. महाराष्ट्रातून उद्योगधंदे पळवणाऱ्यांना आणि मराठी भाषेचा अपमान करणाऱ्यांना आता जनता धडा शिकवेल. मराठी सक्तीच्या मुद्द्यावर काही जणांनी कोर्टात धाव घेतली असली तरी, मराठी जनतेचा आवाज दडपता येणार नाही. - उद्धव ठाकरे         

हिंदी भाषिक राज्ये आर्थिकदृष्ट्या मागास, हिंदी भाषा नसलेली राज्ये आर्थिकदृष्ट्या सक्षम, हिंदीवाले इकडे येतायत. आणि हे म्हणतायत हिंदी शिका, कोणासाठी शिकायचं. भाषेबद्दल वाईट नाही वाटत. भाषा कोणतीही असो श्रेष्ठच असते. - राज ठाकरे