गोड्या पाण्यातील मासळी उत्पादन विक्रमी पातळीवर

शेवटो, कोळंबी उत्पादनात वाढ : सहा वर्षांतील सर्वाधिक वाढ

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
12 hours ago
गोड्या पाण्यातील मासळी उत्पादन विक्रमी पातळीवर

पणजी : राज्यात २०२४-२५ मध्ये गोड्या पाण्यातील मासळी उत्पादन ८६८४ टन होते. हे गेल्या सहा वर्षांतील विक्रमी उत्पादन ठरले आहे. गतवर्षीच्या तुलनेत गोड्या पाण्यातील (इनल्यांड) मासळी उत्पादन वाढले आहे. यंदा शेवटो, कोळंबी आणि मुड्डोशीच्या उत्पादनात वाढ झाली आहे. तर तिसऱ्यो, चोणकच्या उत्पादनात किंचित घट झाली आहे. २०२४-२५ ची आकडेवारी ही तात्पुरत्या स्वरूपाची असल्याने एकूण उत्पादनात आणखी वाढ होण्याची शक्यता असल्याचे मत्स्योद्योग खात्यातील अधिकाऱ्यांनी सांगितले.
मिळालेल्या माहितीनुसार, २०१९-२० पासून २०२४-२५ दरम्यान गोड्या पाण्यातील मासळी उत्पादनात दरवर्षी वाढ होत आहे. २०१९-२० मध्ये मासळी उत्पादन ४०८१ टन होते. २०२०-२१ मध्ये ५३२५ टन होते. २०२२-२३ मध्ये गोड्या पाण्यातील एकूण मासळी उत्पादन ६,३०८ टन होते. २०२३-२४ मध्ये त्यात २०९० टनांची वाढ होऊन ते ८६५१ टन झाले. तर २०२४-२५ मध्ये ते ८६८४ टन झाले.
२०२३-२४ मध्ये लहान, मध्यम आणि मोठ्या आकाराच्या कोळंबीचे १३८४ टन उत्पादन झाले होते. २०२४-२५ मध्ये ते वाढून २२७८ टन झाले.
याशिवाय २०२३-२४ मध्ये शेवट्यांचे उत्पादन ७९७ टन होते. २०२४-२५ मध्ये ते ८३० टन झाले. २०२३-२४ मध्ये मुड्डोशीचे उत्पादन १५३ टन होते. २०२४-२५ मध्ये ते २२३ टन झाले. केर माशांचे उत्पादन एका वर्षात ६ टनांनी वाढून ६० टन झाले. २०२३-२४ मध्ये चोणक उत्पादन २४४ टन होते. २०२४-२५ मध्ये त्यात ४३ टनांची घट होऊन ते २०२ टन झाले. २०२३-२४ मध्ये २०२३-२४ मध्ये तिसऱ्याचे उत्पादन ८६६ टन होते ते २०२४-२५ मध्ये ५६४ टन झाले.
......
काळुंदर, खेकड्यांचे उत्पादन घटले
गतवर्षीच्या तुलनेत यंदा गोड्या पाण्यातील काळुंदर, खेकड्यांचे उत्पादन घटले आहे. २०२३-२४ मध्ये खेकड्यांचे उत्पादन ७९१ टन होते. २०२४-२५ मध्ये ते कमी होऊन ६७२ टन झाले. २०२३-२४ मध्ये काळुंदरचे उत्पादन ८४२ टन होते. २०२४-२५ मध्ये ते ६८४ टन झाले.