शिक्षण विभागाचे नियम कागदावरच : ८ वर्षांनंतरही नियमांचे होतेय उल्लंघन
पणजी : विद्यार्थ्यांच्या वह्या-पुस्तकांच्या बॅगांचे वजन त्यांच्या शरीराच्या वजनाच्या १० टक्क्यांपेक्षा जास्त नसावे, असे स्पष्ट निर्देश शिक्षण संचालनालयाने दिले आहेत. मात्र, हे नियम कागदावरच राहिल्याचे दिसत आहे, कारण अनेक शाळा अजूनही या नियमांचे पालन करत नाहीत. शिक्षण संचालनालयाने याबाबत आठ वर्षांपूर्वी परिपत्रक काढूनही, विद्यार्थी अजूनही जड दप्तरांचे ओझे घेऊन शाळांमध्ये जात असल्याचे निदर्शनास येत आहे.
राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाने जारी केलेल्या पत्रकाच्या आधारे, शिक्षण संचालनालयाने परिपत्रक काढले होते. यात शाळांना संदर्भ पुस्तकांचा वापर कमी करण्यास, वेळापत्रकानुसारच पुस्तके आणण्यास सांगण्यास आणि शाळांमध्ये पुस्तके ठेवण्यासाठी लॉकर उपलब्ध करून देण्यास सांगितले होते. मात्र, विद्यार्थ्यांच्या बॅगचे वजन कमी करण्यासाठी शाळांनी अद्याप पुरेशी पावले उचललेली नाहीत, तसेच या निर्देशांचे पालन न करणाऱ्या शाळांवर सरकारने कोणतीही कारवाई केलेली नाही.
दरम्यान, काही शाळा या निर्देशांचे पालन करत असल्याचे सांगतात, परंतु प्रत्यक्षात विद्यार्थी जड बॅगा घेऊन शाळेत जाताना दिसतात.
शिक्षण संचालकांचे स्पष्टीकरण
शिक्षण संचालक शैलेश झिंगडे यांनी सांगितले की, बॅगांचे वजन कमी करण्यासाठी कोणत्याही नव्या सूचनेची गरज नाही. २०१७ मध्येच एक परिपत्रक जारी केले आहे, ज्याचे शाळांनी काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे. ते म्हणाले की, शिक्षकांना वर्गात नियमांची आठवण करून दिली जाते आणि शाळा व्यवस्थापन व विभागीय अधिकाऱ्यांच्या बैठकांमध्येही हे मुद्दे मांडले जातात.
शाळांसमोरील आव्हाने
- बॅगांचे वजन कमी करण्यासाठी विद्यार्थ्यांनी नवी पुस्तके घरी ठेवून शाळेत जुन्या पुस्तकांचा वापर करावा, असे सांगितले जाते, पण अनेक शाळांमध्ये जुनी पुस्तके साठवण्यासाठी लॉकर उपलब्ध नाहीत.
- काही शाळा सकाळी आणि दुपारी अशा दोन वेगवेगळ्या शिफ्टमध्ये वर्ग घेतात, त्यामुळे पुस्तके साठवणे अवघड होते.
- परीक्षेच्या तयारीसाठी विद्यार्थ्यांना अनेक पुस्तके सोबत ठेवावी लागतात, त्यामुळेही बॅगांचे वजन वाढते.