कॅन्सरची झपाट्याने होत असलेली वाढ चिंताजनक : मुख्यमंत्री

साखळीत मातोश्री पद्मिनी दिवसानिमित्त कॅन्सर जागृती कार्यक्रम


05th July, 11:41 pm
कॅन्सरची झपाट्याने होत असलेली वाढ चिंताजनक : मुख्यमंत्री

कार्यक्रमात मातोश्री स्व. पद्मिनी सावंत यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व सुलक्षणा सावंत.
वार्ताहर। गोवन वार्ता
साखळी : सध्या कॅन्सरचे रुग्ण सर्रासपणे आढळून येत आहेत. ही स्थिती चिंताजनक असून लोक नकळत या आजाराकडे ओढले जात आहेत. कॅन्सरची पूर्वनिदान चाचणी प्रत्येकाने करून घेणे आवश्यक बनले आहे. पूर्वटप्प्यातच कॅन्सरचे निदान झाल्यास त्यावर उपचार करणे सोपे ठरते. दुर्लक्षामुळे आजार बळावल्यास उपचार कठीण होतात. यासाठी सतर्क राहून सर्वांनी कॅन्सरची पूर्वनिदान चाचणी करून घ्यावी, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या मातोश्री पद्मिनी सावंत यांच्या जयंतीनिमित्त साखळीतील साई नर्सिंग इन्स्टिट्यूट महाविद्यालयात आयोजित ‘मातोश्री पद्मिनी दिवस’ कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते. व्यासपीठावर प्रसिद्ध कॅन्सर तज्ज्ञ डॉ. शेखर साळकर, साई नर्सिंगचे अध्यक्ष पांडुरंग कुट्टीकर, व्यवस्थापक संतोष मुळीक, संचालिका प्रा. आदिती सावंत देसाई, मिनेझिस ब्रागांझा इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष दशरथ परब उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते समई प्रज्वलित करून व मातोश्री पद्मिनी सावंत यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. कॅन्सरतज्ज्ञ डॉ. शेखर साळकर यांनी कॅन्सरबाबत सविस्तर माहिती दिली. या सोहळ्यात साई नर्सिंग इन्स्टिट्यूटतर्फे सायली नाईक, विश्वास माणगावकर व संदीप नाईक यांचा उत्कृष्ट कामगिरीबद्दल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
साखळीत साई नर्सिंग इन्स्टिट्यूटमध्ये सुरू केलेल्या नॅचरोपॅथी व योगी सायन्स हे शिक्षण भविष्यात उपयोगी पडणार आहे. आरोग्य तंदुरुस्त ठेवण्यासाठी नॅचरोपॅथी व योगी सायन्स पद्धती अवलंबल्यास रोगमुक्त जीवन जगणे शक्य होईल.
_ डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री