कैदी मंथन च्यारीकडून सीम कार्ड जप्त, मोबाईलचा शोध सुरू

कोलवाळ कारागृहातील गांजा तस्करी प्रकरण

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
12 hours ago
कैदी मंथन च्यारीकडून सीम कार्ड जप्त, मोबाईलचा शोध सुरू

म्हापसा : कोलवाळ येथील मध्यवर्ती कारागृहात गोळा फेकीतून झालेल्या गांजा तस्करी प्रकरणी अटक केलेला कैदी मंथन च्यारी याच्याकडून पोलिसांनी सीम कार्ड जप्त केले आहे. याच सीम कार्डच्या माध्यमातून संशयिताने आपल्या साथीदारांशी ड्रग्ज तस्करीसाठी संपर्क साधला होता.

मंथन च्यारी याने हे सीम कार्ड कारागृहातच लपवले होते. कारागृह प्रशासनाच्या सहाय्याने कोलवाळ पोलिसांनी ते शोधून काढत जप्त केले आहे. मात्र, या सीम कार्डच्या वापरासाठी लागणारा मोबाईल पोलिसांना सापडला नाही. सदर मोबाईल मंथन च्यारी याने कारागृहातील आपल्या सहकारी कैद्यांच्या मदतीने लपवून ठेवला असण्याची शक्यता आहे.

संशयित मंथन च्यारी (रा. खोर्ली - म्हापसा) याच्यासह या प्रकरणातील त्याचे साथीदार गौतम तलवार (रा. अन्साभाट- म्हापसा), सॅम्युअल पुजारी (रा. अन्साभाट-म्हापसा) व जाफर मुल्ला (रा. गंगानगर, खोर्ली- म्हापसा) या चौघांनाही म्हापसा न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली असता पोलिसांनी त्यांची कोलवाळ कारागृहात रवानगी केली.

दरम्यान, हा गांजा तस्करीचा प्रकार दि. १४ जून रोजी पहाटे घडला होता. कारागृहाच्या वॉच टॉवरवरील कर्मचार्‍यांना कारागृहातील दोन संरक्षक भिंतींच्या दरम्यान असलेल्या खुल्या जागी प्लास्टिकमध्ये गुंडाळलेले गोळे नजरेस पडले होते. तपासणीवेळी सापडलेल्या सात गोळ्यांमध्ये गांजा असल्याचे स्पष्ट झाले होते. नंतर कारागृह अधीक्षकांनी दि. १५ जून रोजी कोलवाळ पोलिसांत ड्रग्ज तस्करीची तक्रार दिली होती. पोलिसांनी तपासकाम करीत दि. २५ जून रोजी एका अल्पवयीनासह चार जणांना अटक केली होती. या संशयितांच्या माहितीच्या आधारे पोलिसांनी दि. २७ रोजी कैदी मंथन च्यारीला अटक केली होती.

कारागृह परिसरात गांजाचे गोळे

१४ जूनच्या पहाटेच्या सुमारास, कारागृहाच्या वॉच टॉवरवरील कर्मचार्‍यांना दोन संरक्षक भिंतींमधील मोकळ्या जागेत प्लास्टिकमध्ये गुंडाळलेले संशयास्पद गोळे आढळून आले. यानंतर करण्यात आलेल्या तपासणीत, त्या सातही गोळ्यांमध्ये एकूण १.३९७ किलो वजनाचा गांजा आढळून आला. या घटनेमुळे कारागृहातील सुरक्षा व्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते.

हेही वाचा