जोयडा : चोर्ला घाट मार्गानंतर आता बेळगाव - गोवा राष्ट्रीय महामार्गावरील अनमोड घाटातून अवजड वाहनांना बंदी घातल्यामुळे रामनगर - कारवार राज्य मार्गावर अवजड वाहनांची वर्दळ वाढली आहे. त्यामुळे या मार्गावर अपघाताचा धोका वाढला आहे.
कुसमळी पुलावरून अवजड वाहनांना बंदी घालून चोर्ला मार्गे गोव्यात जाणाऱ्या अवजड वाहनांनी बेळगाव- खानापूर-जांबोटी या रस्त्याचा वापर करण्याचे आदेश बेळगाव जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते. मात्र, खानापूर ते जांबोटी पर्यंतचा १८ कि. मी अरुंद रस्ता असून या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे अवजड वाहनधारक गोव्यात ये जा करण्यासाठी खानापूर- जांबोटी रस्त्याऐवजी खानापूर- रामनगर- अनमोड रस्त्याचा वापर करीत होते. मात्र, शनिवारी अनमोड घाटात रस्ता खचल्याने हा घाटही अवजड वाहनांसाठी दोन महिने बंद करण्यात आला आहे.
अनमोड आणि चोर्ला हे दोन्ही मार्ग गोव्यात ये -जा करण्यासाठी अवजड वाहनांना बंद झाल्याने आता कारवार- गोवा हा एकच मार्ग अवजड वाहतुकीसाठी सुरक्षित आहे. त्यामुळे आता बेळगाव आणि इतर भागातून येणारी अवजड वाहने रामनगर- कारवार आणि यल्लापूर- कारवार मार्गे गोव्यात जात असून या मार्गांवर वाहतुकीचा ताण वाढला आहे.
अणशी, अरेबैल घाट किती सुरक्षित?
अनमोड घाट अवजड वाहनांसाठी वाहतुकीस बंद झाल्याची कल्पना नसलेले वाहनधारक गोव्यात जाण्यासाठी रामनगरपर्यंत येतात व तेथून रामनगर- अणशी घाट - कारवार मार्गे गोव्यात जात आहेत. दुसरीकडे हुबळी, धारवाड येथून येणारी अवजड वाहने यल्लापूर- अरेबैल घाट- कारवार मार्गे गोव्यात ये जा करीत आहेत. त्यामुळे या दोन्ही घाट मार्गाने अवजड वाहनांचा ताण वाढला आहे. दरवर्षी या दोन्ही घाटात पावसाळ्यात दरडी कोसळण्याचे प्रकार घडतात. जीओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाने जिल्ह्यातील अनेक ठिकाणी दरड कोसळण्याची शक्यता असल्याचा अहवाल दिला आहे. त्यामुळे हे दोन्ही घाट मार्गही अवजड वाहतुकीसाठी सुरक्षित नसल्याचे दिसून येते.