साखळी : मुख्यमंत्र्यांनी साखळी येथील विठ्ठल-रखुमाई मंदिरात केली पूजा

विविध मंदिरांत भाविकांची गर्दी

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
06th July, 04:35 pm
साखळी : मुख्यमंत्र्यांनी साखळी येथील विठ्ठल-रखुमाई मंदिरात केली पूजा

डिचोली : आषाढी एकादशीनिमित्त संपूर्ण गोवा आज भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाला होता. राज्यातील पांडुरंगाच्या प्रत्येक मंदिरात भाविकांच्या दिंड्या दाखल झाल्या होत्या. अनेक मंदिरांमध्ये भजनी सप्तकांचे आयोजन करण्यात आले होते, तर उपवासासाठी नैवेद्यही अर्पण करण्यात आला.

रविवारी साखळी येथील श्री विठ्ठल-रखुमाई मंदिरात हजारो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी देखील या मंदिरात सपत्नीक पूजा केली. मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी विठ्ठल-रखुमाईच्या चरणी सर्व गोमंतकीयांच्या जीवनात सुख, शांती आणि समृद्धी नांदावी अशी प्रार्थना केली. तसेच गोवा राज्याच्या समृद्धीसाठीही त्यांनी साकडे घातले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी देवस्थान समितीने भाविकांसाठी केलेल्या उत्कृष्ट व्यवस्थेबद्दल आणि चांगल्या आयोजनाबद्दल अभिनंदन केले. तेथे उपस्थित वारकरी भक्तांशी मुख्यमंत्र्यांनी संवाद साधला आणि सर्व गोमंतकीयांना एकादशीच्या शुभेच्छा दिल्या.

दरम्यान, सुंदर पेठ युवक मंडळ आणि रोटरॅक्ट क्लब डिचोली यांच्या वतीने आषाढी एकादशीनिमित्त दीडशे वारकऱ्यांची पायी वारी काढण्यात आली. डिचोलीचे आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांनी या वारीत सहभाग घेतला. त्यांच्यासोबत समरेश काणेकर, प्रशांत शिरोडकर, नारायण बेतकीकर यांच्यासह अनेक जण सहभागी झाले होते. डिचोलीसह सत्तरी तालुक्यातील विठ्ठलपूरच्या पांडुरंग मंदिरातही मोठ्या उत्साहात दिंड्या दाखल झाल्या.


हेही वाचा