मूर्तींची चोरी नाहीच, शास्त्रानुसारच विसर्जन!

साखळी दत्तमंदिर समितीचे स्पष्टीकरण : मामलेदार, पोलिसांविरोधात करणार तक्रार

Story: वार्ताहर। गोवन वार्ता |
10 hours ago
मूर्तींची चोरी नाहीच, शास्त्रानुसारच विसर्जन!

साखळी : येथील श्री दत्त मंदिरातील मूर्ती चोरी प्रकरण हे याच देवस्थानातील काही महाजनांनी रचलेले षडयंत्र आहे. मागील समितीने या मूर्ती विसर्जित करण्याचा घेतलेला निर्णय प्रलंबित राहिल्याने ते कार्य आम्ही पूर्ण केले. सदर मूर्तींचे विसर्जन हे निव्वळ शास्त्रानुसार करण्यात आले आहे. त्यात कोणताही चोरीचा प्रकार नाही, असे देवस्थान समितीच्या पदाधिकाऱ्यांनी देवस्थान कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.

पत्रकार परिषदेस सचिव गजानन भट गावकर, मुखत्यार श्याम बोडके, खजिनदार विठ्ठल सामंत, सल्लागार सदस्य दीपेश कामत, अॅड. निहाल कामत, अॅड. शर्मद बोडके, सल्लागार समिती सदस्य नरसिंह भटगावकर, नागेश दाबोलकर, संजय बोडके आदींची उपस्थिती होती.

याप्रकरणी डिचोलीच्या मामलेदारांनी आपल्या अधिकाराचा पूर्ण गैरवापर केला असून त्यांच्या विरोधात मुख्य सचिव, उत्तर गोवा जिल्हाधिकारी व इतर यंत्रणांकडे खटला दाखल करण्यात येणार आहे, असे देवस्थान समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

साखळीतील श्री दत्तात्रय मंदिरात कोणत्याही मूर्तींची चोरी झालेली नाही. तीन मूर्ती नार्वे तीर्थावर विसर्जित केल्या आहेत. समितीच्या निवडणुकीनंतर आम्ही कामाक्षी देवीकडे प्रसाद घेतला असता देवस्थानात असलेल्या काही मूर्तींमध्ये दोष असल्याचे दाखवून देण्यात आले होते. त्यात या तीन मूर्ती प्रसादात दोष असल्याचे नमूद करण्यात आले होते. त्या त्वरित विसर्जित करण्याची सूचना देण्यात आली होती. त्यानुसार त्या मूर्ती नार्वे तीर्थावर विसर्जित केल्या. यात चोरीचा प्रकार नसून या देवस्थानच्या दोन महाजनांनी रचलेले हे कारस्थान आहे. त्यांनीच मामलेदारांकडे तक्रार केली होती, असे समितीचे मुखत्यार श्याम बोडके यांनी सांगितले.

दि. २७ रोजी डिचोली मामलेदारांनी सकाळी ११ वा. नोटीस बजावून संध्याकाळी ४ वा. हजर राहण्याची सूचना केली. त्यावेळी खजिनदार विठ्ठल सामंत हे हजर राहिले. त्याच रात्री डिचोली पोलीस स्थानकात चार जणांच्या नावाने तक्रार केली. दि. २८ रोजी सकाळी आपण कार्यालयात आलो असता आपणास पोलिसांनी ताब्यात घेतले व अटक केली. त्यानंतर आपले पुत्र अॅड. शर्मद बोडके व आमचे कायदेशीर सल्लागार अॅड. नेहाल कामत यांनी कायदेशीर व तांत्रिक बाजू सांभाळली. आपणास व दीपेश कामत यांना जामीन मिळाला, असेही श्याम बोडके यांनी सांगितले.

मूर्तींचे विसर्जन, चोरी प्रकरण खोटे

या प्रकरणात देवस्थान समितीच्या कोणत्याही पदाधिकाऱ्यांचा हात नसून हे संपूर्ण प्रकरण खोटे आहे. देवतांचा प्रसाद व शास्त्रानुसार या मूर्तींचे विसर्जन करण्यात आले आहे. सध्या हे प्रकरण देवस्थान प्रशासकाकडे न्यायप्रविष्ठ असल्याने आपण देवस्थान समितीचे अध्यक्ष या नात्याने प्रत्यक्षात पत्रकार परिषदेत बोलू शकत नाही. फोनवरच प्रतिक्रिया देत असल्याचे देवस्थान समितीचे अध्यक्ष राजेश धेंपे यांनी सांगितले. 

हेही वाचा