मंत्री सुभाष शिरोडकर : सहकार खात्याचा चौथा स्थापना दिवस उत्साहात
कार्यक्रमाचे उद्घाटन करताना सहकार मंत्री सुभाष शिरोडकर. बाजूला नरेंद्र सावईकर, प्रकाश वेळीप, सतीश मराठे व इतर.
फोंडा : शेतकऱ्यांना सरकारी योजनांचे पैसे वेळेवर मिळण्यात अनेकदा अडथळे येतात. मात्र, दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या दूध विक्रीचा मोबदला दर महिन्याच्या दहा तारखेपर्यंत अदा करण्यात येईल, अशी ग्वाही सहकार मंत्री सुभाष शिरोडकर यांनी दिली. तसेच, दूध थकबाकी रक्कम या महिन्याच्या ३० तारखेपर्यंत पूर्णपणे दिली जाईल, असेही त्यांनी जाहीर केले.
सहकार खात्याच्या चौथ्या स्थापना दिवसाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून सतीश मराठे, गोवा बागायतदार संस्थेचे अध्यक्ष नरेंद्र सावईकर, आदर्श सहकारी संस्थेचे अध्यक्ष प्रकाश वेळीप, तसेच सहकार सचिव यतेंद्र मरळकर आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी शिरोडकर म्हणाले, गोव्यातील सहकार क्षेत्र कात टाकत आहे. आज सहकार क्षेत्रातील अनेक घटक वेगळ्या दृष्टीने विचार करत आहेत. यामुळे विविध व्यवसायही सहकार क्षेत्रात दाखल होत आहेत. गोव्यातील प्रत्येक गावात ‘सहकार ग्राम’ स्थापन करण्याचे उद्दिष्ट आहे आणि त्यासाठी मी दिवसाचे आठ तास काम करण्यास तयार आहे. ग्रामीण अर्थव्यवस्थेसाठी सहकार क्षेत्र महत्वाचे ठरणार असून, नव्या पिढीला या क्षेत्रात आणण्यासाठी पोषक वातावरण निर्माण होत आहे.
आजच्या घडीला सहकार क्षेत्रात संगणकीकरण व डिजिटायझेशन ही काळाची गरज आहे. सरकारकडून सहकारी कायद्यात वेळोवेळी सुधारणा केल्या जातील आणि त्याचे पालन प्रत्येकाने निष्ठेने करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
तसेच सहकार क्षेत्रातील अनुभवी व्यक्तींना गोंवण्याची गरज आहे आणि नव्या कल्पना, नवीन उद्योग यांचा समावेश सहकार क्षेत्रात व्हावा, यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे. घरपोच सुविधा यांसारख्या संकल्पना जर सहकारी संस्थांमार्फत अमलात आणल्या, तर अधिकाधिक नागरिक सहकाराशी जोडले जातील, असे ते म्हणाले.
कार्यक्रमाची सुरुवात सहकार खात्याचे निबंधक अशुतोष आपटे यांच्या स्वागत व प्रस्ताविकेने झाली. मार्गदर्शनासाठी सतीश मराठे आणि सहकार सचिव यतेंद्र मरळकर यांचीही उपस्थिती होती.
नवीन सहकारी संस्थांना नोंदणीपत्र वाटप
कार्यक्रमात १८ नव्या सहकारी संस्थांना सहकार मंत्री सुभाष शिरोडकर यांच्या हस्ते नोंदणी पत्रके देण्यात आली. संस्कृती सहकारी पतसंस्था, सप्तर्षी सहकारी पतसंस्था, अंत्रुज सहकारी पतसंस्था, सारथी सहकारी पतसंस्था, जीविका पतसंस्था, सह्याद्री पतसंस्था, सक्षम पतसंस्था, कुटुंब पतसंस्था, संगम पतसंस्था, कोजागिरी पतसंस्था, स्त्री शक्ती कृषी सहकारी सोसायटी, दिशा प्राथमिक कृषी सहकारी सोसायटी, शिवतुर्गा कृषी सोसायटी, कुंडई टेम्पो ओनर्स सहकारी सोसायटी, अंबिका डेअरी सहकारी संस्था, नागवंती पतसंस्था, श्री सत्यनारायण सेल्फ हेल्प ग्रुप सहकारी संस्था यांचा समावेश आहे.