मारहाण, विनयभंग, लैंगिक अत्याचार करण्याचा झाला होता प्रयत्न
पणजी : बार्देश तालुक्यात एका महिलेला २०२१ मध्ये मारहाण करून तिचा विनयभंग करण्यात आला होता. तसेच तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न झाला होता. या प्रकरणातील पीडित महिलेची आणि इतर साक्षीदारांची न्यायालयात उलटतपासणी झाली नसल्यामुळे संशयित युवकाची पुराव्याअभावी निर्दोष सुटका केली आहे. याबाबतचा आदेश जलदगती न्यायालयाच्या न्या. दुर्गा मडकईकर यांनी दिला.
या प्रकरणी कळंगुट पोलिसांनी ११ जानेवारी २०२१ रोजी गुन्हा दाखल केला. पीडित महिलेने तक्रार दाखल केली होती. त्यानुसार, संशयित युवकाने २३ डिसेंबर २०२० ते ११ जानेवारी २०२१ दरम्यान महिलेला मारहाण केले. तसेच तिचा विनयभंग करण्यात आला होता. तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्नही केला. घटनेची वाच्यता केल्यास तिला आणि तिच्या आईला जीवे मारण्याची धमकी दिली होती, अशी माहिती पीडित महिलेने तक्रारीत नमूद केली. याची दखल घेऊन पोलिसांनी सदर युवकाविरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम ३२३, ३४२, ५०४, ५०६(ii) ३५४(ए), ३७६ आरडब्ल्यू ५११ व इतर कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करून संशयिताला अटक केली होती. त्यानंतर पोलिसांनी तपास पूर्ण करून न्यायालयात संशयित युवकाविरोधात आरोपपत्र दाखल केले. दि. ७ जून २०२१ रोजी न्यायालयाने संशयिताची जामिनावर सुटका केली. त्यानंतर न्यायालयाने प्रथमदर्शनी पुराव्याची दखल घेऊन २ जानेवारी २०२४ रोजी आरोप निश्चित करून खटला सुरू केला. याच दरम्यान पीडित महिलेची आणि तिच्या आईची उलटतपासणी घेण्यासाठी त्या दोघांना न्यायालयाने पाचारण केले असता, ते दोघे विदेशात असल्याचे सांगितले. तसेच पीडित महिलेने खटला पुढे सुरू ठेवण्यास नकार दर्शविला. त्यानंतर या प्रकरणी न्यायालयाने तपास अधिकाऱ्याची उलटतपासणी करून संशयिताविरोधात पुरावे नसल्यामुळे त्याची निर्दोष सुटका केली.
पीडितेचा खटला चालू ठेवण्यास नकार
पीडित महिला आणि तिची आई यांना उलटतपासणीसाठी न्यायालयाने पाचारण केले होते. मात्र, त्या दोघी सध्या विदेशात असल्याची माहिती समोर आली आहे. यासोबतच पीडित महिलेने खटला पुढे सुरू ठेवण्यास नकार दर्शविला असून, न्यायालयात याबाबत कळवण्यात आले आहे.