प्रथमच ‘सबडर्मल इंप्लॅन्ट’चा वापर : शरीरात बसवण्याची, काढण्याची प्रक्रिया वेदनारहित
प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : राज्यातील कुटुंब नियोजन आता अधिक प्रभावी होणार आहे. आरोग्य खात्याने गर्भधारणा रोखणाऱ्या आधुनिक ‘सबडर्मल इंप्लॅन्ट’ या नवीन गर्भनिरोधक साधनाचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. हे इंप्लॅन्ट त्वचेमध्ये सहजपणे आणि वेदनारहित पद्धतीने बसवण्यात येतात. यामुळे महिलांना गर्भनिरोधक गोळ्या, कॉपर टी किंवा अन्य कोणत्याही साधनांपेक्षा अधिक चांगला पर्याय उपलब्ध झाला आहे. राज्य कुटुंब कल्याण केंद्राचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. उत्तम देसाई यांनी ही माहिती दिली.
डॉ. देसाई यांनी सांगितले की, सबडर्मल इंप्लॅन्ट हे तांदळाहून थोड्या मोठ्या आकाराचे असतात. हे त्वचेच्या वरच्या स्तरावर घातले जातात. एकदा त्वचेत गेल्यावर हे इंप्लॅन्ट साधारणपणे दोन ते तीन वर्षे कार्यरत असतात. इंप्लॅन्ट शरीरात असताना गर्भधारणा होत नाही. इंप्लॅन्ट शरिरातून पुन्हा काढण्याची प्रक्रियादेखील वेदनारहित आहे. सध्या आरोग्य खात्यातील डॉक्टरांना इंप्लॅन्ट बसवण्याचे प्रशिक्षण देण्याचे काम सुरू आहे. त्यांना याबाबत इतर माहिती देण्यात येणार आहे. यानंतर हे इंप्लॅन्ट दोन्ही जिल्हा हॉस्पिटल आणि गोमेकॉ हॉस्पिटलमध्ये उपलब्ध होतील.
‘सबडर्मल इंप्लॅन्ट’ पूर्णपणे मोफत उपलब्ध असणार आहेत. इच्छुक महिलेच्या शरीराला योग्य असतील तरच ते बसवले जातील. याशिवाय केंद्राकडे गर्भधारणा रोखण्याची पाच ते सहा अन्य साधनेही उपलब्ध आहेत. सध्या बहुतेक महिला ‘कॉपर टी’ अथवा गोळ्या घेऊन गर्भधारणा टाळतात. ही साधने उपयुक्त असली तरी काही महिलांना ‘कॉपर टी’बाबत तक्रारी असतात. आपल्या शरीरात ‘कॉपर टी’ नको, अशी त्यांची भावना होते. गोळ्या प्रभावी असल्या तरी त्या नियमितपणे घ्याव्या लागतात. गोळ्या घेणे चुकले तर गर्भधारणा होण्याची शक्यता असते. यामुळे ‘सबडर्मल इंप्लॅन्ट’ हे अधिक उपयुक्त ठरू शकतात.
कुटुंब नियोजनाबाबत कुणावरही सक्ती नाही !
देशाच्या तुलनेत गोव्यातील प्रजनन दर कमी आहे. असे असल्याने कुटुंब नियोजनाबाबत कुणावरही सक्ती केली जात नाही. याबाबतचा निर्णय कुटुंब अथवा त्या महिलेने घ्यायचा असतो. आम्ही महिलांचे समुपदेशन करतो आणि त्यांची इच्छा असेल तरच त्यांना गर्भनिरोधक साधने देतो. याशिवाय केंद्रातर्फे पुरुषांना मोफत कंडोम दिले जातात. कंडोम घेणाऱ्यांची माहिती घेतली जात नाही. कंडोम घेतना कुणाला शरम वाटू नये यासाठी ते इस्पितळाबाहेरील बॉक्समध्ये ठेवण्यात आले आहेत, असे डॉ. देसाई यांनी सांगितले.