सुरक्षेचे उपाय नसतील तर फौजदारी कारवाई
प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : सुरक्षेच्या उपायांंसाठी जनरेटर, इन्वर्टरांंची तपासणी वीज खात्यातील एमआरटीचे अभियंंते अचानक करणार आहेत. सुरक्षेचे उपाय नसतील तर जनरेटर काढण्यासाठीची कायदेशीर प्रक्रिया सुरू केली जाईल. लाईनमन, अभियंंत्यांंच्या सुरक्षेसाठी ही कारवाई होणार आहे, अशी माहिती मुख्य वीज अभियंंते स्टीफन फर्नांडिस यांनी दिली.
आस्थापने, सामान्य ग्राहक वीजपुरवठ्यासाठी जनरेटर, इन्वर्टर बसवत असतात. ते बसवताना अर्थिंग व अन्य सुरक्षेचे उपाय करणे गरजेचे असते. काही लोक या उपाययोजनांना फाटा देतात. त्याचा फटका ट्रान्स्फॉर्मर वा अन्य दुरुस्तीची कामे करणाऱ्या लाईनमनना बसण्याची शक्यता असते. विजेचा शॉक बसून लाईनमनचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर वीज खात्याने इशारा देणारी नोटीस जारी केली आहे. जनरेटर वा इन्वर्टर बसवण्यासाठी मान्यता घेणे, तसेच सुरक्षेचे उपाय करणे सक्तीचे आहे, असे वीज खात्याने स्पष्ट केले आहे.
एमआरटीचे अभियंंते वीज मीटरची बिलांंसाठी तपासणी करत असतात. त्यावेळी ते जनरेटर/इन्वर्टरची तपासणीही करतील. अर्थिंग तसेच अन्य सुरक्षेचे उपाय केले नसतील तर फौजदारी कारवाई करण्यात येईल, असा इशारा वीज खात्याने नोटिसीद्वारे दिला आहे.