म्हापशात चेंबर बांधून होणार प्रक्रिया
प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : रसायन वापरून फळे पिकवण्याचे प्रकार बंद करण्यासाठी कृषी खाते फळे पिकवण्यासाठी पुढाकार घेणार आहे. सुरुवातीला म्हापसा सब-यार्डात चार चेंबर बांधून त्यात फळे ठेवून इथिलीन गॅस सोडला जाईल. ही प्रक्रिया नैसर्गिक आणि सुरक्षित आहे. गणेशचतुर्थीपूर्वी लोकांना रसायनरहित फळे खायला मिळतील, असा विश्वास कृषी संचालक संदीप फळदेसाई यांनी व्यक्त केला.
अन्न आणि औषध प्रशासनाने (एफडीए) छापे टाकून रासायनिक पद्धतीने पिकविलेली फळे जप्त केली होती. या पार्श्वभूमीवर कृषी संचालनालयात आयोजित पत्रकार परिषदेत फळदेसाई बोलत होते. एफडीए कृषी उत्पादनांवर कारवाई करते, तेव्हा त्याची जबाबदारी कृषी खात्यावर येते. कृषी खात्याअंतर्गत गोवा कृषी उत्पादन आणि मार्केटिंग बोर्ड स्थापन झाले आहे. त्यांचे कार्यालय सर्व तालुक्यांत आहेत. या बोर्डअंतर्गत ग्राहकांना चांगली फळे मिळावीत यासाठी उत्पादकांना फळे पिकवण्याची सुविधा उपलब्ध करून देणे ही आमचीच जबाबदारी आहे, असे फळदेसाई यांनी स्पष्ट केले.
फळे, विशेषकरून केळी रसायनांचा वापर करून पिकविली जातात. या प्रक्रियेत सुधारणा करण्याची गरज असल्याचे आमच्या लक्षात आले. त्यामुळेच म्हापसा सब यार्डात फळे पिकविण्यासाठीचे चार चेंबर बांधण्याचे काम सुरू केले आहे. प्रत्येक चेंबरमध्ये दिवसाला १५ टन केळी पिकविण्यासाठी ठेवली जातील. या चेंबरमध्ये इथिलीन गॅस सोडून नैसर्गिक पद्धतीने केळी पिकविली जातील. आंबेही येथे पिकविले जातील.
म्हापशात दररोज ७ ते ८ टन केळीची आवक
उत्तर गोव्यात म्हापसा बाजारात सर्वाधिक केळी येतात. तेथून अन्य भागात त्यांची विक्री केली जाते. दररोज ७ ते ८ टन, तर सणासुदीच्या काळात १५ ते १६ टन केळी म्हापसा यार्डात येतात, असेही फळदेसाई यांनी सांगितले.