राज्यात सात वर्षांत ६४ सरकारी प्राथमिक शाळा बंद

पटसंख्या कमी मुख्य कारण :


10 hours ago
राज्यात सात वर्षांत ६४ सरकारी प्राथमिक शाळा बंद


प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : राज्यात मागील सात वर्षांत ६४ सरकारी प्राथमिक शाळा बंद पडल्या आहेत. पटसंख्या कमी अथवा शून्य असल्यानेच या शाळा बंद पडल्या. मागील सात वर्षांत शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मध्ये सर्वाधिक १४ शाळा बंद पडल्या. तर यंदा, २०२५-२६ वर्षात तीन सरकारी शाळा बंद पडल्या. शिक्षण खात्यातील सूत्रांनी ही माहिती दिली.
मिळालेल्या माहितीनुसार, २०२५-२६ मध्ये तीन शाळांमध्ये पुरेशी पटसंख्या नसल्याने त्या बंद करण्यात आल्या आहेत. या शाळा नजीकच्या शाळांसोबत विलीन करण्यासाठी शिक्षण खात्याने सरकारकडे प्रस्ताव पाठवला आहे. मात्र याबाबत अंतिम निर्णय झालेला नाही. २०१९-२० मध्ये १० सरकारी शाळा बंद पडल्या. यातील डिचोलीतील ४, पेडण्यातील २, केपेतील २, तर तिसवाडी आणि फोंडा तालुक्यांतील प्रत्येकी एका शाळेचा समावेश होता.
२०२०-२१ मध्ये बंद पडलेल्या ११ पैकी डिचोलीतील ३, फोंड्यातील २, सांगेतील २, सत्तरीतील २, तर पेडणे आणि बार्देशमधील प्रत्येकी एका शाळेचा समावेश होता. २०२१-२२ मध्ये ८, तर २०२२-२३ मध्ये ११ सरकारी शाळा बंद पडल्या. २०२३-२४ मध्ये बंद पडलेल्या १४ पैकी काणकोणमधील ५, सासष्टीतील ३, डिचोलीतील ३, फोंडा, सांगे, मुरगाव तालुक्यांतील प्रत्येकी एका शाळेचा समावेश होता. २०२४-२५ मध्ये ७ शाळा बंद पडल्या. यातील ४ डिचोली, तर ३ फोंडा तालुक्यातील होत्या.
सर्वाधिक शाळा बंद डिचोलीत
२०१९-२० ते २०२५-२६ दरम्यान डिचोली तालुक्यात सर्वाधिक सरकारी प्राथमिक शाळा बंद झाल्या. एकूण ६३ पैकी १५ शाळा डिचोलीतील होत्या. काणकोण तालुक्यातील १२, फोंडा तालुक्यातील ७ शाळा बंद पडल्या आहेत.