तीन वर्षांत फक्त ११ पुरुषांवर शस्त्रक्रिया
प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : राज्यात कुटुंब नियोजनसाठी महिला आणि पुरुषांची वेगवेगळ्या पद्धतीची नसबंदीची शस्त्रक्रिया करण्यात येते. मागील तीन वर्षांत सरकारी इस्पितळात एकूण ५,१९४ नसबंदी शस्त्रक्रिया करण्यात आल्या. यातील ५,१८३ शस्त्रक्रिया (९९.७८ टक्के) महिलांच्या होत्या, तर केवळ ११ पुरुषांवर (०.२१ टक्के) कुटुंब नियोजनासाठी शस्त्रक्रिया करण्यात आल्या. आरोग्य खात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली.
आरोग्य खात्यातर्फे पुरुषांच्या नसबंदीसाठी ‘व्हिसेक्टमी’, तर महिलांसाठी ‘ट्युबेक्टमी’ नामक शस्त्रक्रिया केली जाते. आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये १,४६३ महिलांच्या, तर केवळ ३ पुरुषांच्या नसबंदी शस्त्रक्रिया झाल्या. २०२३-२४ मध्ये महिलांच्या १,९९१, तर पुरुषांच्या ५ शस्त्रक्रिया झाल्या. २०२४-२५ मध्ये १,७२९ महिलांच्या, तर ३ पुरुषांच्या नसबंदी शस्त्रक्रिया झाल्या.
याविषयी अधिकाऱ्यांनी सांगितले की, संपूर्ण देशात महिलांच्या तुलनेत पुरुषांच्या शस्त्रक्रिया कमी होतात. याला विविध कारणे आहेत. कुटुंब नियोजनासाठी शस्त्रक्रिया महिलेने करायची की पुरुषाने हा त्यांना वैयक्तिक निर्णय असतो. आरोग्य खाते सक्ती करू शकत नाही. मुळात मूल जन्माला घालण्याच्या प्रक्रियेत पुरुष केवळ शुक्राणू देतात. बाकीचे गरोदरपणा, प्रसूती, मूल वाढवणे, कुटुंब सांभाळणे हे महिलांनाच करावे लागते. त्यामुळे कदाचित महिलाच आपली शस्त्रक्रिया करून घेत असाव्यात.
खात्यातर्फे समुपदेशन
खात्यातर्फे कुटुंबांना, विशेषकरून महिलांना समुपदेशन दिले जाते. कायमस्वरूपी नसबंदी करायची की तात्पुरत्या स्वरूपाची गर्भधारणा रोखायची आहे, याची माहिती घेतली जाते. त्यानुसार उपचार केले जातात. खात्यातर्फे तात्पुरत्या स्वरूपाची गर्भधारणा रोखण्याची साधनेही पुरवली जातात. गोव्याचा विचार करता येथील लोकसंख्या, प्रजनन दर कमी आहे. अशा वेळी कुटुंब नियोजनाची सक्ती न करता कुटुंबाने दोन अपत्यांच्या जन्मात योग्य अंतर राखावे यासाठी प्रयत्न केले जातात, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.