निघाले सारे जण ‘छोटू दादाची’ शाळा पाहायला. छोटू दादाची शाळा जितकी छोटू दादाची होती, तितकीच आजोबांची सुद्धा होती.
आता पृथाला छोटू दादाची शाळा पाहण्याचे वेध लागले होते. दुसऱ्या दिवशी छोटू दादा आला, तसं तिने लगेच विचारून टाकलं, “ए दादा, मला नेशील तुझी शाळा बघायला?”
छोटू दादाला तर इतका आनंद झाला, काही विचारू नका! “खरंच पाहायची आहे तुला माझी शाळा? खरंच येशील तू? तू येच, पृथा. तुझ्या आईबाबांना सुद्धा घेऊन ये.”
‘अय्या! हे तर सुचलंच नव्हतं आपल्याला! आईबाबा पण आले तर किती धमाल!’
पृथाच्या मनाने एखादी गोष्ट घेतली, की अख्ख्या घराला तिच्या भोवती फिरावंच लागतं. काय बिशाद आहे कुणाची ‘नाही’ म्हणायची! पृथाने सगळ्यात आधी आईला तयार केलं. मग आईने बाबाला. बाबा सुरुवातीला थोडा कुरकुरत होता, “काय बघणार तुम्ही आश्रमशाळेत?” असं कंटाळून म्हणत होता. पण पृथाचा हट्टच आहे म्हटल्यावर करतो काय बिचारा? झाला तयार!
आजोबांना तर खूपच आनंद झाला. “वा वा, पृथाताई! अगं, मला खूप वाटायचं एकदा तरी तुला आमची आश्रमशाळा दाखवायला हवी. पण मग वाटायचं – जाऊ दे, लहान आहेस तू. तुझं तुला वाटेल तेव्हा येशील. आज तू स्वतःहून शाळा बघायला जायचं म्हणते आहेस, तर किती आनंद वाटतो आहे, बाळा!”
बाकी सगळं ठीकच होतं, पण मागच्या अनुभवानंतर पृथाने अगदी ठरवून टाकलं होतं की गुंड्याला सोडून कुठेही जायचं नाही.
“गुंड्याला न्यायचं म्हणजे न्यायचंच!” पृथाने घरात जाहीर करून टाकलं. गुंड्यानेही पृथाच्या म्हणण्यात आपला ठाम ‘म्याऊ’ मिसळला.
“अगं, कसं नेणार त्याला? चालेल का तो एवढं?” पृथाचा हा भलता हट्ट आईला मुळीच रुचला नाही.
“मी उचलून घेईन त्याला!” पृथा ओठांचा चम्बु करत म्हणाली.
“तुलाच आम्हाला उचलून घ्यावं लागणार आहे! आली मोठी गुंड्याला उचलणारी!” आधीच सुट्टीत आराम करायचा सोडून हे आश्रमशाळेला भेट द्यायचं वगैरे ठरल्यामुळे बाबा जरा नाराजच होता. त्यात पृथाच्या या हट्टामुळे तो चांगलाच वैतागला.
'आई–बाबा' विरुद्ध 'पृथा–गुंड्या' असा सामना रंगणार असं दिसू लागताच आजीने लगेच मध्यस्थी केली.
“पृथा, आपण असं करू. मी तुला एक बास्केट देते. त्यात घालून गुंड्याला नेऊ. गुंडेबा, नीट बास्केटमध्ये बसायचं. इकडे-तिकडे उड्या नाही हां मारायच्या! वागशील ना शहाण्यासारखा?”
गुंड्याचा लगेच समजूतदार ‘म्याऊ’!
मग काय, निघाले सारे जण ‘छोटू दादाची’ शाळा पाहायला. छोटू दादाची शाळा जितकी छोटू दादाची होती, तितकीच आजोबांची सुद्धा होती.
दर पावसाळ्यात हे भातशेती मजूर गावात यायचे. मग भातशेतीचा हंगाम असेपर्यंत — म्हणजे चार-पाच महिने — त्यांचा मुक्काम गावातच असायचा. शेतालगतच कुठेतरी झोपड्या, तंबू उभारून हे मजूर राहत असत. रस्त्यावरून जाता-येता आजोबांना मजुरांची मुलं शेताच्या बांधावर बसलेली दिसायची. उन्हात, पावसात, चिखलात खेळत असायची. थोडी मोठी मुलं लहान भावंडांना सांभाळताना दिसायची. त्याहून मोठी मुलं शेतात आईबाबांसोबत राबताना दिसायची. त्यांना बघून आजोबांना वाटायचं – “या मुलांनी शिकायला हवं.”
दहा वर्षांपूर्वी आजोबा नोकरीतून निवृत्त झाले. तेव्हा त्यांनी ठरवूनच टाकलं – या मुलांसाठी एक आश्रमशाळा सुरू करायची. सगळ्यात मोठा प्रश्न जागेचा होता. शाळेसाठी जागा हवी, इमारत हवी. हा प्रश्न आजोबांच्या मित्राने- देव्हरेकरांनी सोडवला. त्यांच्या मुलाने गावातच नवीन बंगला बांधला होता. देव्हरेकर आजोबा आणि आजी मुलाबरोबर नव्या घरात राहायला गेले आणि त्यांचा भलामोठा जुना वाडा ओस पडला. मग देव्हरेकरांनी हाच वाडा शाळेसाठी वापरायला दिला आणि जागेचा प्रश्न मिटला.
त्यापुढेही अनेक प्रश्न उभे राहिले आणि आपोआप सुटत गेले. कारण आजोबांनी सुरू केलेली ही शाळा एकट्या आजोबांची न राहता अख्ख्या गावाची झाली. आजोबांचे जुने, जाणते मित्र तर मदत करतच होते, पण गावातले तरुणही आजोबांच्या पाठीशी ढाल बनून उभे राहिले. खूप खटपटी, लटपटी करून सरकारची परवानगी मिळवली. पुढे हळूहळू सरकारी अनुदानही मिळालं.
सरकारी अनुदान आलं, तेव्हा सरकारकडून एक शिक्षकही आला. हो! फक्त एकच. पहिलीपासून दहावीपर्यंत सगळ्या वर्गांना मिळून एकच शिक्षक! कारण विद्यार्थ्यांची संख्या कमी. या शाळेत छोटू दादासकट एकूण मुलं फक्त वीस! आणि त्यांना शिकवायला शिक्षक फक्त एक – तेच हे छोटू दादाचे 'पवार गुरुजी!'
पवार गुरुजी या शाळेत आले आणि ही शाळा, शाळा न राहता घर बनून गेली. पवार गुरुजी आणि त्यांच्या वीस मुलांचं एक छोटंसं घर!
आजोबांना खूप वाटायचं की पृथाने ही शाळा पाहावी. त्या वीसही मुलांना भेटावं. त्यांच्याशी मैत्री करावी. पण मग त्यांना वाटायचं, “लहान आहे अजून ती. तिचं तिला समजायला लागलं की मग येईल शाळा पाहायला.”
...पण आज तो दिवस आलाच की!
आजोबा उत्साहाने सगळ्यांच्या पुढे-पुढे चालले होते. त्यांच्या मागून, “अहो, जरा हळू, जरा हळू,” असं म्हणत आजी. तिच्या मागून पृथाचे आई–बाबा आणि सगळ्यात शेवटी पृथा – गुंड्याच्या बास्केटसकट!
डाॅ. गौरी प्रभू
९०८२९०५०४५