अपघात विश्लेषण अहवाल : घातवेळेत सर्वाधिक ५१७ अपघात, तर ६३ अपघाती मृत्यू
गोवन वार्ता
पणजी : राज्यात गतवर्षी झालेले अपघात आणि अपघाती मृत्यू हे सायं. ६ ते रात्री ९ या दरम्यान सर्वाधिक होते. वरील काळात १९.२८ टक्के, म्हणजे ५१७ अपघात, तर २२.०३ टक्के, म्हणजे ६३ मृत्यू झाले. याबरोबरच शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात सर्वाधिक अपघात आणि अपघाती मृत्यू झाले आहेत, अशी माहिती वाहतूक पोलीस विभागाच्या ‘वार्षिक अपघात विश्लेषण अहवाल २०२४’मधून समोर आली आहे.
राज्यात २०२४ मध्ये एकूण २,६८२ अपघात झाले. त्यात २८६ अपघाती मृत्यू झाले. राज्यात २०२४ मध्ये २७६ जण गंभीर, तर ७६५ जण किरकोळ जखमी झाले. सायंकाळी ६ ते रात्री ९ दरम्यान ५१७ अपघात, तर ६३ मृत्यू झाले. या काळात ५१ जण गंभीर, तर १८० जण किरकोळ जखमी झाले. पहाटे ६ ते सकाळी ९ दरम्यान २५३ अपघात, तर ३३ अपघाती मृत्यू झाले. या काळात ३३ जण गंभीर, तर ५४ जण किरकोळ जखमी झाले. सकाळी ९ ते दुपारी १२ दरम्यान ३६९ अपघात, तर ४२ अपघाती मृत्यू झाले. या काळात ४६ जण गंभीर, तर ९८ जण किरकोळ जखमी झाले. दुपारी १२ ते ३ दरम्यान ३७८ अपघात, तर २७ अपघाती मृत्यू झाले. तर या काळात ३३ जण गंभीर, तर १०७ जण किरकोळ जखमी झाले.
दुपारी ३ ते सायंकाळी ६ दरम्यान ४४४ अपघात आणि ४२ अपघाती मृत्यू झाले. या काळात ४५ जण गंभीर, तर १६९ जण किरकोळ जखमी झाले. रात्री ९ ते मध्यरात्री १२ दरम्यान ३४९ अपघात, तर ३५ अपघाती मृत्यू झाले. या काळात ४० जण गंभीर, तर ९७ जण किरकोळ जखमी झाले. मध्यरात्री १२ ते उत्तररात्री ३ दरम्यान २३१ अपघात, तर ३३ अपघाती मृत्यू झाले. या काळात १८ जण गंभीर तर ३६ जण किरकोळ जखमी झाले. उत्तररात्री ३ ते पहाटे ६ दरम्यान १४१ अपघात, तर ११ अपघाती मृत्यू झाले. या काळात १० जण गंभीर, तर २४ जण किरकोळ जखमी झाले.
शहरापेक्षा ग्रामीण भागात अधिक अपघात
राज्यात २०२४ मध्ये २,६८२ अपघात झाले. त्यातील ७२.१८ टक्के म्हणजे १,९३६ अपघात ग्रामीण भागात झाले. शहरी भागात २७.८२ टक्के म्हणजे ७४६ अपघात झाले. गतवर्षी राज्यात २८६ अपघाती मृत्यू झाले. त्यातील ८०.०७ टक्के म्हणजे २२९ ग्रामीण भागातील व्यक्तींचे मृत्यू झाले. शहरी भागातील १९.९३ टक्के म्हणजे ५७ व्यक्तींचे अपघाती मृत्यू झाले.