२०-२५ वर्षे सेवा बजावूनही कॉन्स्टेबल पदावरूनच निवृत्त होण्याची वेळ
प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : गोवा पोलीस खात्यात उपनिरीक्षक ते काॅन्स्टेबलची सेवा बजावणारे अनेकजण कित्येक वर्षांपासून बढतीसाठी पात्र असताना बढती झाली नसल्यामुळे निराश आहेत. काही कर्मचारी तर आता काही दिवसांत निवृत्त होणार आहेत. त्यामुळे किमान त्या कर्मचाऱ्यांची बढती करावी, असा सूर पोलीस कर्मचाऱ्यांतून व्यक्त होत आहे. पोलीस खात्यात बढतीसाठी सुमारे २,८०० हून अधिक कर्मचारी प्रतीक्षेत आहेत, अशी माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गोवा पोलीस खात्यात २००१ मध्ये भरती झालेले काॅन्स्टेबल २४ वर्षे सेवा बजावत आहेत. त्यातील काही जणांनाच बढती मिळाली; मात्र ३५० हून अधिक जण बढतीपासून वंचित आहेत. २० ते २५ वर्षे सेवा बजावलेले सुमारे २००० काॅन्स्टेबल बढतीसाठी पात्र आहेत. हवालदारपदी सेवा बजावत असलेले सुमारे ३५० कर्मचारी बढतीसाठी पात्र आहेत. तसेच साहाय्यक उपनिरीक्षक पदावरील २०० जण, तर उपनिरीक्षकपदी सेवा बजावत असलेले सुमारे २२५ जण बढतीसाठी प्रतीक्षेत आहेत.
दरम्यान या संदर्भात अनेक कर्मचाऱ्यांनी पोलीस खात्याशी पत्रव्यवहार करून बढतीचा मुद्दा उपस्थित केला. मात्र त्यांच्या मागणीची कोणीच दखल घेतलेली नाही. त्यामुळे ते निराशा झाले आहेत. अनेक कर्मचारी पुढील काही महिन्यांत निवृत्त होणार आहेत. त्यामुळे काही कर्मचाऱ्यांना काॅन्स्टेबलपदावरूनच निवृत्त व्हावे लागणार आहे.
बढतीबाबत अनेकांचे वरिष्ठांना साकडे
सरकार पोलीस खात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना, तसेच इतर खात्यातील कर्मचाऱ्यांना वेळोवेळी बढती देत असते. काही वेळा पदे उपलब्ध नसल्यास ती तयार करून भरती केली जात आहे. काही अधिकाऱ्यांना तर बढतीसाठी आवश्यक सेवाकाळ वर्षाची अट शिथिल करून बढती दिली जात अाहे. पोलीस खात्यातील कर्मचाऱ्यांच्या बढतीचा मार्ग मोकळा करण्याची मागणी अनेक कर्मचाऱ्यांनी वरिष्ठांकडे लेखी पत्राद्वारे केली अाहे.