भारताचाही डाव ३८७ धावांवर आटोपला!

आघाडी घेण्याची संधी हुकली : केएल राहुलचे दमदार शतक

Story: न्यूज डेस्क । गोवन वार्ता |
12th July, 11:54 pm
भारताचाही डाव ३८७ धावांवर आटोपला!

लॉर्ड्स : भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसरा कसोटी सामना लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर रंगतदार स्थितीत पोहोचला आहे. सध्या दोन्ही संघांनी पहिला डाव ३८७ धावांवर संपवला असून उर्वरीत दाेन्ही डावांवर सामन्याचा निकाल अवलंबून आहे.
नाणेफेक जिंकून इंग्लंडचे कर्णधार बेन स्टोक्स यांनी फलंदाजीचा निर्णय घेतला आणि संघाने पहिल्या डावात ३८७ धावा फलकावर लावल्या. इंग्लंडकडून जो रूटने शानदार शतक (१०४ धावा) साजरे केले. भारताकडून जसप्रीत बुमराहने भेदक मारा करत ५ बळी घेतले, तर मोहम्मद सिराज व रवींद्र जडेजाने प्रत्येकी २-२ गडी बाद केले.
इंग्लंडचा पहिला डाव ३८७ धावांवर आटोपल्यानंतर, भारतीय संघाकडून केएल राहुल आणि यशस्वी जैस्वालची जोडी डावाची सुरूवात करण्यासाठी मैदानात आली. भारताला सुरूवातीलाच मोठा धक्का बसला. यशस्वी जैस्वाल १३ धावा करत माघारी परतला. त्यानंतर करूण नायर आणि केएल राहुल यांनी मिळून भारतीय संघाचा डाव सांभाळला. दोघांनी मिळून महत्वपूर्ण भागीदारी केली. मात्र, करूण नायर ४० धावा करत माघारी परतला. कर्णधार शुबमन गिल १६ धावांवर माघारी परतला. दुसऱ्या दिवशी भारतीय संघाने ३ गडी बाद १४५ धावा केल्या.
राहुल- पंतची शतकी भागीदारी
तिसऱ्या दिवशी मैदानात आलेल्या ऋषभ पंतने आक्रमक अंदाजात ७४ धावा फटकावत केएल राहुलसह शतकी भागीदारी केली. राहुलने या सामन्यात शतक झळकावले, जे भारताच्या डावाचा कणा ठरले. त्यानंतर रवींद्र जडेजानेही ७२ धावांची झुंजार खेळी करत भारताला मजबूत स्थितीत नेले. नितीश कुमार रेड्डीने ३०, आकाश दीपने ७ धावांची खेळी केली. भारतीय संघाचा डावही ३८७ धावांवर आटोपला. भारताला आघाडी घेण्याची संधी होती, मात्र इंग्लंडच्या गोलंदाजांनी ती संधी हिरावून घेतली. भारताचे शेपूट पुन्हा एकदा अपयशी ठरले. इंग्लंडकडून ख्रिस वाॅक्सने ३, जोफ्रा आर्चर आणि कर्णधार बेन स्टोकने प्रत्येकी २ तर ब्रँडन कार्से व शोएब बशीरने प्रत्येकी १ गडी बाद केला.
केएल राहुलचे विक्रमी शतक
केएल राहुलने या मालिकेतील दुसरे शतक झळकावले. तसेच लॉर्ड्सच्या मैदानावर खेळताना त्याचे हे दुसरे शतक आहे. भारतीय संघाच्या पहिल्या डावातील ६७ व्या डावात केएल राहुलने १०० धावांचा पल्ला गाठला. भारतीय संघाला सुरूवातीला मोठे धक्के बसले होते. यशस्वी जैस्वाल, करूण नायर आणि कर्णधार शुबमन गिल स्वस्तात माघारी परतले होते. पण केएल राहुलने न डगमगता एक बाजू धरून ठेवली आणि भारतीय संघाला २५० धावांच्या पार पोहोचवले. यादरम्यान त्याने ऋषभ पंतसोबत मिळून १०० धावांची भागीदारी केली. लॉर्ड्सच्या मैदानावर डावाची सुरूवात करताना सर्वाधिक शतक झळकावण्याचा विक्रम आता केएल राहुलच्या नावावर आहे. त्याने आतापर्यंत २ शतके झळकावली आहेत. तर विनू मंकंड यांच्या नावे १ आणि रवी शास्त्री यांच्या नावे देखील १ शतक आहे. भारताकडून लॉर्ड्सच्या मैदानावर खेळताना केवळ या ३ सलामीवीरांना शतक झळकावता आले आहे.

ऋषभ पंतने मोडला रिचर्ड्सचा विक्रम
ऋषभ पंतने या सामन्यात षटकारासह अर्धशतक पूर्ण केले. यासह तो इंग्लंडविरुद्ध टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार लगावणारा जगातील पहिला फलंदाज ठरला आहे. यासह त्याने व्हिव्हियन रिचर्ड्स यांना मागे टाकले. पंतने बेन स्टोक्सला षटकार मारत आपले अर्धशतक पूर्ण केले. या षटकारासह त्याने इंग्लंडविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये एकूण ३५ षटकार लगावले आहेत. यामुळे त्याने व्हिव्हियन रिचर्ड्स यांचा ३४ षटकारांचा विक्रम मोडला.रिचर्ड्स यांनी १७ वर्षांच्या कसोटी कारकिर्दीत इंग्लंडविरुद्ध ३६ कसोटी सामन्यांत ३४ षटकार लगावले होते. दुसरीकडे, पंत सध्या लॉर्ड्स येथे इंग्लंडविरुद्ध आपला १२वा कसोटी सामना खेळत आहे आणि त्याने हा विक्रम आपल्या नावावर केला आहे. यासह त्याने भारताचा माजी कसोटी कर्णधार रोहित शर्माच्या विक्रमांची बरोबरी केली आहे.
पंतची रोहित शर्माच्या विक्रमाशी बरोबरी
ऋषभ पंतने पहिल्या डावात भारतासाठी ११२ चेंडूंवर ७४ धावा केल्या आणि केएल राहुलसोबत चौथ्या गड्यासाठी १४१ धावांची भागीदारी केली. ६६ व्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर बेन स्टोक्सने पंतला धावबाद केले. दरम्यान पंतने धावबाद होण्यापूर्वी आठ चौकार आणि दोन षटकार मारले. यासह त्याच्या कसोटी कारकिर्दीतील एकूण षटकारांची संख्या ८८ झाली आहे. त्याने रोहित शर्माच्या षटकारांच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. भारतीय फलंदाजांमध्ये फक्त वीरेंद्र सेहवाग (९१ षटकार) यानेच पंतपेक्षा जास्त षटकार मारले आहेत.
इंग्लंडविरुद्ध सर्वाधिक षटकार मारणारे खेळाडू
ऋषभ पंत: ३५ षटकार
व्हिव्हियन रिचर्ड्स: ३४ षटकार
टिम साउदी: ३० षटकार
यशस्वी जैस्वाल: २७ षटकार
शुबमन गिल: २६षटकार
लॉर्ड्सवर सर्वाधिक शतके झळकावणारे भारतीय सलामीवीर
केएल राहुल- २
विनू मंकंड -१
रवी शास्त्री – १
संक्षिप्त धावफलक :
इंग्लंड : पहिला डाव ३८७, दुसरा डाव : बिनबाद ०
भारत : पहिला डाव ३८७